जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल १५ कोटीची फसवणूक, २५ लाखांना गंडा..या आणि अशा बातम्या सातत्याने आपण वाचत आहोत, पाहत आहोत, ऐकत आहोत. या अमिषाला लोक बळी पडत होते आणि आजही पडत आहेत. फसवणुकीच्या इतक्या घटना घडूनही लोक धडा घेताना दिसत नाहीत.
गुंतवणुकीवर मिळवा भरघोस परतावा मिळवा, शेअर मार्केटमध्य गुंतवणूक, ट्रेडिंग, महागड्या वस्तू, वाहने, घर स्वस्तात मिळवा, …अशा वेगवेगळ्या प्रकारे जाहिराती केल्या जातात, त्याकडे लोक आकर्षित होतात आणि फसवणूक करून घेतात. गेली अनेक वर्षे लोक असले फंडे वापरून विविध मार्गानी लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. यात अनेक जणांनी आयुष्यभर कमावलेले पैसे गमावले आहेत. तरी देखील समाजात अशा घटना नवीन पद्धतीने घडत आहेत. या फंड्याना अशिक्षतच नव्हे तर मध्यमवर्गीय, उच्च शिक्षितही बळी पडत आहेत, ही शोकांतिका.

टोरेस कपंनीकडून मुंबईतील लाखो लोकांची झालेली फसवणूक ही ताजी घटना असली तरी अलीकडच्या काळात अशा वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये अतिशय कमी गुंतवणुकीवर कमी कालावधीत अधिक व्याज, परतावा किंवा बक्षिसे, महागड्या वस्तू, वाहने, घरे कमी किमतीत देण्याच्या आमिषाला भुलून अनेकांना अक्षरशः घर, मालमत्ता विकून कंगाल होण्याची वेळ आली आहे.
जास्त परताव्याचे आमिष दाखवून केली जाणारी फसवणूक ही अलीकडच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे. या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आपण सतर्क राहणे हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.
ही फसवणूक नेमकी काय आहे ?
झटपट श्रीमंत होणे, कमी कालावधीत दामदुप्पट पैसे व्हावेत, हा हव्यास लोकांना अशा योजनांकडे आकर्षित करतो. या फसवणुकीत फसवणूक करणारे लोक एखादी कंपनी स्थापन करून गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतात आणि त्या बदल्यात त्यांना कमी कालावधीत अधिक अथवा दुप्पट, तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवतात. सुरवातीला विश्वास संपादन करण्यासाठी थोडी रक्कम देतातही, आणि एकदा का विश्वास निर्माण केला कि, टाळाटाळ करत प्रत्यक्षात ते पैसे परत करत नाहीत, आणि अचानक गाशा गुंडाळून गायब होतात. मग गुंतवणूकदारांची धावाधाव सुरु होते.
जादा परताव्यातून फसवणूक खालीलप्रमाणे केली जाते :
पॉन्झी स्कीम :
या प्रकारात फसवणुकीत नवीन गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन जुन्या गुंतवणूकदारांना परत केले जातात. यामुळे नवीन गुंतवणूकदारांना वाटते की स्कीम खूप चांगली चालू आहे आणि तेही त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. मात्र, जेव्हा नवीन गुंतवणूकदारांची संख्या कमी होऊ लागते, तेव्हा फसवणूक करणारे लोक पळून जातात.
मल्टी-लेव्हल मार्केटिंग:
हा एक अलीकडच्या काळातील अधिक चर्चेतील प्रकार आहे. यामध्ये फसवणुकीत लोकांना उत्पादने विकण्याऐवजी नवीन सभासद जोडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जोडलेल्या सभासदांना परत नवीन सभासद जोडण्यास सांगितले जाते, त्यासाठी त्यांना इन्सेन्टिव्ह ऑफर केला जातो आणि अशा प्रकारे एक चेन तयार केली जाते. या चेनमध्ये वरच्या स्तरावरील लोकांना खालील स्तरावरील लोकांनी गुंतवलेल्या पैशातून रक्कम मिळत असते. मात्र, ही योजना टिकून राहण्यासाठी सभासदांची संख्या सतत वाढत रहाणे आवश्यक असते. जेव्हा सदस्यांची वाढ थांबते, तेव्हा ही स्कीम बंद पडते.
क्रिप्टोकरन्सी स्कॅम:
क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली नवीन प्रकारच्या गुंतवणुकीच्या स्कीम सुरू केल्या जातात. या स्कीममध्ये असे सांगितले जाते की तुम्ही कमी पैसे गुंतवून खूप लवकर श्रीमंत होऊ शकता. मात्र, या स्कीममध्ये फसवणूक करण्याची शक्यताच जास्त असते. अलीकडच्या काळात अशा फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघड झाले आहेत.

फेक इन्व्हेस्टमेंट कंपन्या :
यामध्ये आकर्षक नावाने बनावट कंपनी स्थापन केली जाते. ती अधिकृत वाटण्यासाठी कंपन्यांची वेबसाइट आणि सोशल मीडिया प्रोफाइल खूप आकर्षक पद्धतीने तयार करून फोलोवर्स मिळावले जातात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार असल्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात या कंपन्या फसवणूक करण्यासाठीच तयार केल्या जातात.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष:
अनेक जाहिराती आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीद्वारे असे भासविले जाते की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपण रात्रोरात्र श्रीमंत होऊ शकतो. प्रत्यक्षात, शेअर मार्केट हे एक दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे आणि त्यात सातत्याने अस्थिरता असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते.
अलीकडच्या फसवणुकीच्या काही घटना :
मुंबईत टोरेस कंपनीकडून लाखो मुंबईकरांना गंडा :
मुंबई : मुंबईत झालेल्या टोरेस कंपनीच्या चिटफंड घोटाळ्यामुळे अवघ्या देशात एकच खळबळ उडाली. तब्बल 500 कोटी घेऊ ही कंपनी एकाच दिवसांमध्ये गायब झाली. या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होत आहे. आता याप्रकरणातील एक आरोपी महिला कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एवढंच नाहीतर या स्कॅमच्या मागे युक्रेनियन मास्टरमाईंड असल्याचं उघडं झालं आहे. . चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतले जवळपास एक दोन नाही तर तब्बल ३ लाख लोक बळी पडले आहे. संबंधीत कंपनीनं या सर्वांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून पुण्यातील कोथरूड परिसरातील ५३ वर्षीय व्यक्तीची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार १३ जानेवारी २०२५ रोजी दाखल झाली आहे. सायबर गुन्हेगाराने एसएमएसद्वारे मेसेज पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे अमिश दाखविले होते. त्यानंतर फिर्यादीला व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादीने सायबर गुन्हेगारीच्या अकाउंटवर २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर गुन्हेगाराने त्याचा मोबाईल बंद केला.

पिंपरीत वेबसीरीजसाठी गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने फसवणूक :
पिंपरीत वेबसीरीज तयार करण्याचे खोटे सांगून व पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील ५९ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर उर्फ दीपक भटनागर (रा. वर्सोवा ,अंधेरी वेस्ट, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक :
शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत दोघांनी सुमारे ३९ लाखांची फसवणूक केली. सायबर चोरांनी व्हाट्सअप, टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मसच्या माध्यमातून संपर्क साधून अनोळखी लिंकद्वारे तक्रारदाराच्या बँक अकाउंटमधील पैसे गायब केले.
यूट्यूबवर शेअर मार्केटिंग टिप्स शोधत असताना डॉक्टरची फसवणूक
भारतामध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या घोटाळ्यांमध्ये त्रासदायक वाढ होत आहे. घोटाळेबाज संशयित व्यक्तींना बनावट योजनांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत जे सहज पैसे कमविण्याच्या त्यांच्या इच्छेचा फायदा घेतात. अलीकडच्या एका प्रकरणात, तामिळनाडूतील एका सरकारी डॉक्टरने शेअर बाजार मार्गदर्शनाचे आश्वासन देणाऱ्या यूट्यूबवरजाहिरातीवर क्लिक केल्याने घोटाळेबाजांकडून 76.5 लाख रुपये गमावले.
साताऱ्यात ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक :
महिन्याला साडेसहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा व पुण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी फसवणूक कशी टाळायची :
परताव्याच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे :
– गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीचा इतिहास तपासावा
– जर कोणी अल्पावधीत खूप जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत असेल तर सावध व्हा, अशी गुंतवणूक जोखमीचे असू शकतात.
– सोशल मीडियावरच्या अनोळखी व्यक्ती अगर संस्थांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्याचे टाळावे.
– जर गुंतवणूक स्कीम गुप्त ठेवण्याचा आग्रह धरला जात असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ते संशयास्पद असल्याचे समजावे.
– अधिकृत बँका अथवा गुंतवणूक करणाऱ्या संस्थांमध्येच गुंतवणूक करावी
– कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची नोंदणी झाली आहे की नाही हे पाहावे.
– कंपनीच्या टर्म अँड कंडिशन जाणून घ्याव्यात
– कोणत्याही गुंतवणुकीची स्कीम सुरू करण्यापूर्वी त्याबाबत पुरेशी माहिती घ्यावी. या योजनांच्या पार्श्वभूमीची चौकशी करावी.
– एखादी स्कीम संशयास्पद वाटत असेल तर त्यात गुंतवणूक करणे टाळावे.
सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी काय करावे:
– कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याबाबत पुरेशी माहिती घ्यावी.
– SEBI, RBI यासारख्या शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन संबंधित कंपनी किंवा योजनांबद्दलची माहिती घ्यावी.
– गुंतवणूकीच्या निर्णयापूर्वी विश्वासू अर्थ सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
– गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व शर्ती व अति स्पष्टपणे लिहिलेल्या करारावरच सही करावी.
– आपल्या आर्थिक स्थितीनुसारच गुंतवणूक करावी.
– एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवण्याचे टाळावे
– फसवणुकीच्या प्रकारांबद्दल आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जागरूक करावे. त्यांना सुरक्षित गुंतवणूक करण्याचे मार्ग सांगा.
फसवणूक झाली असल्यास काय करावे :
एखादवेळेस फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुढील गोष्टी तातडीने कराव्यात –
– सर्वप्रथम बँकेला कळवून अकाउंटवरील सर्व व्यवहार थांबवण्यास सांगावे.
– बँकेशी सतत संपर्कात राहून पाठपुरावा करावा.
– त्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. तसेच केंद्र सरकारच्या ग्रह खात्याच्या सायबर सुरक्षा वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. तसेच फॉलोअप घ्यावा.
ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून बचावासाठी Law Enforcement Agency आणि सरकारी संस्था सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत, फ्रॉड फोन नंबर ब्लॉक केले आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रकरणांचा तपास करत आहेत. तथापि, या फसवणुकीबाबत जागरूक राहणे आणि सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.