
एका मोबाईलमध्ये सिमकार्ड अॅक्टिव्ह करून त्यावर व्हाॅट्स अॅप सुरू करून व नंतर ते सिमकार्ड काढून त्याचा गैरवापर करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आता चाप बसणार आहे. देशभरात अशा घटना घडल्यानंतर केंद्र सरकार ‘सिम बाइंडिंग’ (Sim Binding) हे नवीन सुरक्षा फिचर आणत आहे. यामुळे यापुढे सिम कार्डशिवाय मोबाईल फोनवर WhatsApp काम करणार नाही. तसेच जर तुम्ही ऑफिस किंवा घरामध्ये काम करताना लॅपटॉप किंवा डेस्कटाॅपवरून वेब व्हॉट्स अॅप (Web WhatsApp)सुरू करून बिनधास्त राहत असाल, तसेच एकदा वेब व्हाॅट्स अॅप लॉगिन केल्यानंतर बरेच दिवस व्हॉट्स अॅपचा व्यत्यय न येता वापर करत असाल तर तुमच्या या सुविधेला आता ब्रेक लागणार आहे. कारण हे वेब व्हाॅट्स अॅप (Web WhatsApp) व्हर्जन दर ६ तासांनी आपोआप बंद होईल. याचा अर्थ असा की, तुम्हाला दिवसातून कमीत कमी दोनवेळा तुमचा फोन बाहेर काढून Web WhatsApp साठी QR कोड स्कॅन करून पुन्हा लॉगिन करावे लागेल. हा नियम केवळ WhatsApp वरच नाही तर Telegram आणि Snapchat सारख्या इतर अॅप्सनाही लागू असणार आहे.

सध्या तुम्ही तुमच्या फोनमधील WhatsApp अॅक्टिव्ह केले की, फोनमधील सिम कार्ड काढले किंवा वाय-फाय वापरले तरीही ते अॅप काम करत राहते, पण हे आता बंद होईल.थोडक्यात काय तर, एका फोनवर वेगवेगळे WhatsApp अकाउंट चालविणे अशक्य होईल. याशिवाय ज्या मोबाईलवर सिमकार्ड वापरून WhatsApp अकाउंट तयार केले गेले आहे, त्या अकाउंटचे सिम न टाकता वेगवेगळ्या फोनमध्ये त्या नंबरने WhatsApp चालवणाऱ्यांनाही अडचणी येणार आहेत.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून यापुढे व्हॉट्स अॅप वापरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला दिसेल. नवीन नियमानुसार, ज्या मोबाईल फोनमध्ये तुमचे नोंदणीकृत सिम कार्ड प्रत्यक्षरीत्या उपलब्ध असेल, त्याच फोनमध्ये व्हॉट्स अॅप अॅक्टिव्ह राहील.
सायबर गुन्हेगार काय करत होते ?
अनेक सायबर गुन्हेगार हे भारतीय फोन नंबर असलेल्या सिमकार्डद्वारे व्हॅाट्स अॅप किंवा इंटरनेट कॉलिंगचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. तसेच WhatsApp सारखे प्लॅटफॉर्म हे फक्त एकदाच मोबाइल नंबर व्हेरिफाय (Verify) करत होते, त्यामुळे गुन्हेगारांना तो नंबर वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरणे सहज शक्य होते होते. सिम बाइंडिंगमुळे अशा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

आता पाहूया , सिम बाइंडिंग काय आहेत ते…
सिम बाइंडिंग हे एक सुरक्षा कवच आहे, की जे आपल्या मेसेजिंग अॅपला (जसे की व्हॉट्स अॅप) आपले भौतिक सिम कार्ड लॉक करते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणताही साबर हॅकर किंवा फसवणूक करणाऱ्याला इतर कोणत्याही डिव्हाइसवरून तुमचा नंबर वापरता येणार नाही. समजा WhatsApp किंवा इतर कोणतेही मेसेजिंग अॅप चालवत असलेल्या आपल्या फोनमधून सिमकार्ड काढून टाकले तर ते अॅप बंद होईल. म्हणजेच WhatsApp सह Signal, Telegram, ShareChat, Snapchat, Aratai, JioChat, Josh सारखे सर्व मेसेजिंग अॅप्स वारंवार पडताळणीशिवाय (Verify) डिव्हाईसवर वापरता येणार नाहीत. फोनवर कोणतेही मेसेजिंग अॅप चालवण्यासाठी त्या अकाउंटशी संबंधित सिमकार्ड फोनमध्ये असणे आवश्यक असणार आहे.
सरकार हे का करत आहे?
तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, सरकार असे का करत आहे. याचे उत्तर म्हणजे सुरक्षा. सरकारने म्हटले आहे की सध्या ऑनलाइन फसवणूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. स्कॅमर बहुतेकदा अशा नंबरवरून व्हॉट्स अॅप वापरतात ज्यांचे सिम कार्ड त्यांच्याकडे नाहीत किंवा ते देशाबाहेरून ऑपरेट करतात. सरकारला वाटते की सिमकार्ड त्याच डिव्हाइसमध्ये असावे, ज्यावरून संबंधीत अॅप वापरले जात आहे, जेणेकरून फसवणूक करणाऱ्यांना सहज ट्रॅक करता येईल.

…तर कारवाई होणार
दूरसंचार विभागाने या टेक कंपन्यांना (व्हॉट्स अॅप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी) त्यांच्या सिस्टम अपडेट करण्यासाठी ९० दिवस (अंदाजे ३ महिने) दिले आहेत. या कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, की अॅप आणि सिम कार्डमधील कनेक्शन सतत असले पाहिजे. जर फोनमधून सिम कार्ड काढले तर अॅप काम करणे थांबवेल. केंद्र सरकारच्या आदेशानुसार मेसेंजर कंपन्यांना 120 दिवसांच्या आत याबाबत अहवाल द्यावा लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास, दूरसंचार सायबर सुरक्षा नियम, दूरसंचार कायदा 2023 आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल.
या मेसेंजरवर परिणाम…
WhatsApp, Signal, Telegram, ShareChat, Snapchat, Aratai, JioChat, Josh यासारख्या प्लॅटफाॅर्म्सना हे नियम लागू .
परदेशात प्रवास करणाऱ्यांना अडचणीचे…
या निर्णयामुळे प्रवाशांचा त्रास वाढू शकतो. आतापर्यंत लोक परदेशात जात असत, तिथे स्थानिक सिम कार्ड घेत असत आणि त्यांचे भारतीय नंबर-आधारित व्हॉट्स अॅप वाय-फायवर काम करत असे. उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नवीन नियमानंतर ही सुविधा संपुष्टात येऊ शकते. जर भारतीय सिमकार्ड फोनमध्ये नसेल तर जुने व्हॉट्स अॅप उपलब्ध होणार नाही.एकंदरीत, सरकारचा हेतू सायबर सुरक्षा मजबूत करण्याचा आहे, परंतु सामान्य युजर्ससाठी डोकेदुखी ठरू शकते. व्हॉट्स अॅपसारख्या जागतिक कंपन्या त्यांच्या सिस्टीममध्ये या भारतीय नियमाचा कसा अवलंब करतात, हे पाहावे लागेल.
ही दक्षता घ्या..
- तुमचे नोंदणीकृत सिम कार्ड फर्स्ट स्लॅाट डिव्हाइसमध्ये ठेवा.
- व्हॉट्स अॅप वेबचा वापर करताना लॉगिन आणि लॅाग आउट करायला विसरू नका
- नवीन फिचर मिळण्यासाठी WhatsApp सह अन्य मेसेंजर वेळावेळी अपडेट करा.
- कारण नसताना फोनमधून सिमकार्ड काढू नका.