
सोशल मिडियावर रिल्स पाहताना अनोळखी लिंक वर क्लिक करणे अथवा अॅप डाऊनलोड करणे टाळा कारण एक क्लिक सायबर फसवणूक करून तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकते. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधून लोकांना भुलवत असून अनेक जणांना याचा आर्थिक फटका बसला आहे. असाच प्रकार गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडला आहे. सायबर गुन्हेगारांची फसवणुकीच्या या पद्धतीमुळे सायबर एक्स्पर्टही चक्रावून गेले आहेत. म्हणजेच कोणत्याही मार्गाने सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात, हेच यातून दिसून येत आहे.
फसवणूक झालेली व्यक्ती आयटी इंजिनिअर असूनही त्याची फसवणूक झाली आहे. त्या व्यक्तीने सोशल मिडियावर रिल्स पहात असताना एका लिंकवर क्लिक केले आणि त्याच्या बँक अकाउंटमधून २५ हजार रुपये काढले गेल्याचे चार दिवसांनंतर त्याच्या लक्षात आले. त्यामुळे रिल्स पाहत असताना फोटो अथवा लिंक आल्यास त्याबाबत खात्री केल्याशिवाय क्लिक करणे अथवा ओपन करणे टाळावे.

आता पाहूया, नेमकं काय झालं ते…
अहमदाबाद येथील आयटी कंपनीतील ४३ वर्षीय एका इंजिनिअरचे गुगल पे अकाउंट असून ते त्याच्या बचत खात्याशी लिंक आहे. 1 मे रोजी तो इंजिनिअर रात्री घरी बसून इन्स्टाग्रामवरील रिल्स पहात होता, याचवेळी त्याने एका व्हिडिओवरील लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक होताच त्याच्या मोबाईलवर एक अॅप्लिकेशन आपोआप डाऊनलोड झाले आणि इन्स्टाॅल झाले, काहीतरी संशयास्पद झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ इन्स्टाॅल झालेले अॅप अनइंस्टाॅल केले, त्यानंतर त्याला धोका टळला असे वाटले आणि तो निश्चिंत झाला.
मात्र, तीन दिवसांनी त्याने गुगल पे अकाऊंट चेक केले असता, धक्काच बसला कारण, त्या अकाउंटमधून २५ हजार रूपये काढले गेल्याचे समोर आले. ट्रांजक्शन हिस्ट्री तपासल्यानंतर त्याला त्या अकाउंटमधून २५ हजार रूपये अन्य खात्यावर ट्रान्स्फर केल्याचे दिसले. त्या आयटी इंजिनिअरने सायबर हेल्पलाईनवरून फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली.
खरेतर मोबाईल नंबरशी पॅन कार्ड, आधारकार्ड, बँक अकाउंटसह सर्वच गोष्टी लिंक आहेत. यावरून तुमचा मोबाईल नंबर किती महत्वाचा आहे, हे लक्षात आले असेल, त्यामुळे मोबाईल नंबर शेअर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्या नंबरचाच व्हाॅटस् अॅप असेल विशेष काळजी घ्यावी, शिवाय सोशल मिडियावर मोबाईल नंबर शेअर करणे, बऱ्याचदा धोकादायक ठरू शकते.

सोशल मीडिया रिल्स पाहताना घ्यावयाची दक्षता…
- कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा, जसे फ्री गिफ्ट, आजच कमवा, या सारख्या ऑफर्स, यातील बहुतेक डिजिटल सापळे असू शकतात.
- रिल्समध्ये तुमची वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास टाळा, जसे ओटीपी, बँक डिटेल्स, आधार, पॅन कार्ड क्रमांक.
- असंख्य रिल्समुळे फसवणुकीला मोठा वाव मिळू शकतो, कारण रिल्स पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार याचाच फायदा घेऊन फसवणुकीसाठी प्रवृत्त करू शकतात.
- बऱ्याचदा इन्फ्ल्युअर्सचे रिल्स मोठ्या प्रमाणात पाहिले जात असतात, मात्र, त्याचाच फायदा घेत, सायबर गुन्हेगार रिल्सच्या काँमेंटमध्ये काही लिंक टाकून युजर्सना भुलवण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा लिंकवर क्लिक करणे टाळावे
- डीपफेक / बनावट व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सेलिब्रिटींच्या आवाजात गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो ? त्यालाही न भुललेच बरे
- रिल्स पाहत असताना बऱ्याचदा अनोळखी अॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते, अथवा लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते, तसे केल्यास अॅप तुमच्या फोनवर आपोआप डाऊनलोड होऊन इन्स्टाॅल होते. आणि तुमच्या फोनचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे जातो.
- बऱ्याच रिल्समध्ये काँमेंट बाॅक्समधील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते, अशावेळी पूर्ण खात्री केल्याशिवाय अशा लिंकवर क्लिक करू नये.
- एखादी रिल्स संशायास्पद वाटत असल्यास, Report करा, यामुळे रिल्सचा कंटेन्ट हा नियमभंग करतो का, फसवणूक होत आहे का, याची तपासणी होते व खोटी माहिती, फसवणूक, द्वेषयुक्त किंवा अश्लील कन्टेंट असल्यास तो हटवला जातो अथवा ब्लाॅक केला जातो.
- सोशल मिडिया अकाउंटमधील प्रायव्हसी सेटिंग्स (Privacy Settings) मजबूत ठेवा, कोणत्या गोष्टी ओपन करायच्या हे ठरवून सेटिंग्ज सेट करावे
- सोशल मिडिया अकाउंट Private ठेवा, जसे वैयक्तिक माहिती, प्रोफाईल, टॅग, अनोळखी मेसेजेसना मर्यादा ठेवा.
- सोशल मिडिया अकाउंटचे पासवर्ड मजबूत, वेगवेगळे तसेच लक्षात राहतील असे ठेवा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुढील गोष्टी करा..
- सर्वप्रथम संबंधीत अनोळखी लिंक, अॅप, वेबसाईट सगळं बंद करा. लाॅगआऊट व्हा
- बँकेशी त्वरित संपर्क साधून अकाउंटवरील सर्व व्यवहार फ्रीझ करावयास सांगा
- बँक खाते, कार्ड किंवा UPI ब्लॉक करण्याची विनंती करा
- UPI चा पासवर्ड ताबडतोब बदला
- आलेले मेसेज स्क्रीनशॉट करा, कॉल नंबर, UPI आयडी, लिंक हे सगळं फोनमध्ये सेव्ह करून ठेवा.
- सायबर क्राइम हेल्पलाईनवर तक्रार करा – 1930 वर कॉल करा (भारतामध्ये)
- cybercrime.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार नोंदवा
- कोल्हापूर सायबर सेलचा हेल्पलाईन नंबर – 84128 41100