
आजच्या डिजिटल युगामुळे आपले जीवन गतीमान झाले असले तरी सायबर गुन्हेगारीही फोफावत चालली आहे. रोज नवनवीन सायबर गुन्हे घडत असून त्यातून मोठी आर्थिक लूट केली जात आहे. अलिकडेच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) ३८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लिक झाल्याचे समोर आले आणि ग्राहकांच्या वैयक्तिक माहिती आणि डेटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आपला पैसा आणि माहिती ही बँकांमध्ये सुरक्षित असते या ग्राहकांच्या भावनेलाच या घटनेने छेद मिळाला आहे. देशातील सर्वांत मोठ्या बँकेतील ग्राहकांची माहिती व डेटा लिक होत असेल तर अन्य बँकांच्या ग्राहकांची माहिती कशी सुरक्षित समजायची असा, प्रश्न आता निर्माण झाला आहे. एसबीआयची माहिती ही डार्क वेबद्वारे लिक झाली आहे. हे डार्क वेब नक्की आहे तरी काय आणि त्याचा सायबर गुन्हेगारीसाठी कसा वापर केला जातो.. चला जाणून घेऊयात…
डार्क वेब हे नक्की काय ते जाणून घेऊ…
आपल्याला माहीत आहे का की, इंटरनेटचा सुमारे ९५ टक्के भाग हा नेहमीच्या सर्च इंजिन्सपासून लपलेला असतो? आणि या लपलेल्या लेअरचा एक मोठा भाग म्हणजेच ‘डार्क वेब’ असू शकतो. हा एक इंटरनेटचा असा एक निनावी हिस्सा असतो, की जो अनेकदा सायबर गुन्हेगारी आणि ओळख चोरीसाठी (identity theft) वापरला जातो. भारतात अलिकडे सातत्याने वैयक्तिक डेटा लिक होण्याच्या आणि डार्क वेबवर बेकायदेशीर व्यवहारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दरवर्षी लाखो युजर्सना याचा फटका बसत आहे.
नावाप्रमाणेच डार्क वेब ही इंटरनेट जगतातील काळी बाजू आहे. इंटरनेटचा वापर हा माहितीची देवाण-घेवाण करणे, संवाद साधणे, आर्थिक व्यवहार करण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा जेव्हा गैरवापर केला जातो, त्याला ‘डार्क वेब’ (Dark Web) असे म्हणतात. या विश्वाचा वापर गोपनीय संवादासाठी केला जात असला, तरी त्याचा गैरवापर सायबर गुन्हेगारीसाठीही केला जातो.

काय आहे डार्क वेब?
डार्क वेब हा इंटरनेटचा एक असा लपलेला भाग आहे, की जो सामान्य ब्राउझर आणि सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेरचा असतो. तो पूर्णपणे निनावी राहण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला असतो. गुगलवर आढळणाऱ्या वेबसाइट्सच्या तुलनेत, डार्क वेबमध्ये विशेष एनक्रिप्शनचा वापर केला जातो, त्यामुळे त्यावरील पेजेस उघडण्यासाठी ‘टॉर’ (Tor) सारख्या विशिष्ट ब्राउझरची आवश्यकता असते.
इंटरनेटचे साधारणपणे सरफेस वेब, डीप वेब आणि डार्क वेब असे तीन भाग समजावून सांगितले जातात. गुगल, बिंग यांसारख्या सर्च इंजिनवर सहज शोधता येणाऱ्या वेबसाइट्सचा समावेश सरफेस वेबमध्ये होतो, यामध्ये गुगल, युट्यूब, विकीपिडिया ही सरफेस वेबमध्ये मोडतात. ई-मेल इनबॉक्स, ऑनलाइन बँकिंग अकाउंट आणि पासवर्डने संरक्षित असलेली माहिती ही डीप वेबची उदाहरणे आहेत. डार्क वेब हा डीप वेबमधील असा भाग आहे, जिथे पोहोचण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर किंवा नेटवर्कची आवश्यकता असते.
डार्क वेब कशा प्रकारे कार्यरत राहते –
डार्क वेब टोर ब्राउझरसारख्या विशेष टुल्सद्वारे लपून राहते, की जे युजर्सची ओळख संरक्षित करण्यासाठी ओनियन रूटिंगचा (onion routing) वापर करते. ओनियन रूटिंग हे इंटरनेटवर तुमची माहिती आणि ओळख गुप्त (anonymous) ठेवण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे नेटवर्क तंत्रज्ञान आहे. ओनियन रूटिंगमध्ये, तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एनक्रिप्ट केला जातो आणि जगभरातील अनेक स्वयंसेवकांनी (volunteer-run servers) चालवलेल्या सर्व्हर्समधून पाठवला जातो. यामुळे एखादी रिक्वेस्ट कुठून आली आहे किंवा कुठे जात आहे, याचा शोध घेणे अत्यंत कठीण होते.
एनक्रिप्शनचीही यात मोठी भूमिका असते, यातील मेसेज प्रत्येक टप्प्यावर एनक्रिप्शनच्या लेअर्सनी वेढलेले असतात, जणू कांद्याचे वरचे थर सोलून काढावेत तसे. यासोबतच, डार्क वेबवरील अनेक वेबसाइट्स ‘डिसेंट्रलाइज्ड होस्टिंग’चा (विकेंद्रित होस्टिंग) वापर करतात; याचा अर्थ असा की, त्या कोणत्याही एका सर्व्हरवर त्या साठवलेल्या नसतात, ज्याला सहजपणे बंद करता येईल किंवा ज्याचा रिव्ह्यू घेता येईल. मात्र, डार्क वेबवरील सर्वच गोष्टी या बेकायदेशीर नसतात. काही युजर्स याचा वापर गोपनीयतेसाठी करतात. मात्र, डार्क वेबवर कोणतेही नियमावली नसल्यामुळे तसेच ते लपलेले असल्यामुळे त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
डार्क वेबचा गैरवापर कसा केला जातो…
डार्क वेबवरील काही प्लॅटफाॅर्मवर ड्रग्ज, चोरीची माहिती, बनावट कागदपत्रे, चोरलेले पासवर्ड, आर्थिक फसवणूक आणि मालवेअर यांची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जाते. चोरी केलेला वैयक्तिक डेटा विकून लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढणे किंवा त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडणे, असे प्रकार केले जातात. काही ठिकाणी रॅन्समवेअर हल्ले करणारे सायबर गुन्हेगारही सक्रिय असतात.

- १६ ऑक्टोबरला स्टेट बँकेच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याबद्दल सतर्कतेचा इशारा CERT-In (Indian Computer Emergency Response Team) कडून देण्यात आला. त्यानंतर म्हणजे पाच दिवसांनी स्टेट बँकेने डेटा लिक झाल्याची कबुली देत २१ ऑक्टोबर २०२६ रोजी एसबीआयने स्टॉक एक्सचेंजला (BSE आणि NSE) ला अधिकृत माहिती दिली. यानंतर डार्क वेबवर साधारण ३.७५ लाख रेकॉर्ड्सची प्राथमिक तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३,८९७ ग्राहकांच्या रेकॉर्डमध्ये वैयक्तिक ओळख पटवणारी संवेदनशील माहिती (PII) असल्याचे स्पष्ट झाले. बँकेने स्पष्ट केले की, या सायबर हल्ल्याचा किंवा डेटा लीकचा बँकेच्या मुख्य बँकिंग प्रणालीवर (Core Banking System) तसेच ग्राहकांच्या पैशांवर किंवा दैनंदिन व्यवहारांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
- या घटनेनंतर एसबीआयने आपली सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम अॅक्टिव्ह केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी CERT-In द्वारे मंजूर केलेल्या स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीची नियुक्ती केली आहे.
- यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे, एसबीआयने ओरियंटल इन्शूरन्स कंपनीकडून सायबर गुन्ह्यांअंतर्गत १४२५ कोटी रुपयांचे सायबर विमा कवच घेतले आहे. त्यामुळे बँकेने विमा कंपनीला याची माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आता जाणून घेऊया, स्टेट बँकेचा डेटा कसा लिक झाला त्याविषयी…
ही माहिती झाली लिक -
नाव, घरचा पत्ता, मोबाईल नंबर, जन्म तारीख, इमेल आयडी, कर्ज अॅप्लिकेशन मेटा डेटा
डेटा लिक होण्यामागची मुख्य कारणे –
१. हॅकर्सनी डार्क वेबवर टाकलेल्या डेटामध्ये मुख्यत्वे लोन ॲप्लिकेशन (Loan Applications), केवायसी (KYC) फाइल्स आणि लीड डेटा यांचा समावेश दिसून आला आहे. ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) सुरक्षित नसतील तर हॅकर्स त्याचा गैरफायदा घेऊन असा डेटा लिक करू शकतात.
२. काही वेळा डेटाबेस सर्व्हरला पासवर्ड प्रोटेक्शन नसते, अन-ऑथेंटिकेटेड क्लाउड स्टोरेज वापरणे किंवा ओपन पोर्ट्स उघडे राहणे यांसारख्या मानवी चुकांमुळे हॅकर्स सहजरीत्या डेटा ॲक्सेस करू शकतात.
३. बँक ही ग्राहक माहिती प्रक्रिया करण्यासाठी (उदा. लोन ॲप्लिकेशन, केवायसी व्हेरिफिकेशन) अनेकदा बाहेरील आयटी सर्व्हिस कंपन्यांची (Vendors) मदत घेते.जर बँकेच्या मुख्य सर्व्हरऐवजी एखाद्या थर्ड-पार्टी सर्व्हरची सुरक्षा कमकुवत असेल किंवा कॉन्फिगरेशन चुकीचे झाले असेल, तर तिथून डेटा लीक होण्याचा मोठा धोका असतो.
४. बँकेतील कर्मचारी किंवा एजंट्सना जाळ्यात ओढण्यासाठी हॅकर्स फिशिंग ईमेल्स किंवा मालवेअर लिंक्सचा वापर करतात. एखाद्या कर्मचाऱ्याचे लॉगिन क्रेडेंशियल्स (Username/Password) चोरीला गेल्यास हॅकर्स सिस्टीममध्ये प्रवेश करून डेटा चोरू शकतात.

या डेटाचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो?
- हॅकर्स बँक ग्राहकांना वैयक्तिकरित्या फोन करून त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन आर्थिक फसवणूक करू शकतात.
- केवायसी, कर्ज मंजूरी तसेच अन्य कारणे सांगून त्यांचा ग्राहकांचा पासवर्ड तसेच अन्य संवेदनशील माहीती चोरू शकतात.
- ग्राहकांच्या माहितीचा वापर अन्य ठिकाणी सायबर गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो
- डिजीटल अरेस्टचा प्रकार ग्राहकांसोबत होऊ शकतो
ग्राहकांनी ही काळजी घ्यावी
- कोणीही बँकेचा अधिकारी बनून OTP, UPI PIN, Passcode किंवा NetBanking पासवर्ड मागितल्यास तो अजिबात देऊ नका.
- KYC अपडेट किंवा कर्ज मंजुरीसारख्या अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.
- तुमच्या बँक अकाऊंटमधील प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळण्यासाठी एसएमएस अॅलर्ट सेवा सुरू ठेवा