
आज पैशांच्या व्यवहारासाठी गुगल पे, फोनपे, पेटीएमसह विविध पेमेंट अॅपचा पावलोपावली वापर होत आहे. लोक पैसे जवळ बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना अधिक पसंती देताना दिसत आहेत. मात्र, ही जमेची बाजू असलीतरी थोड्याशा चुकीमुळे बँक अकाऊंट रिकामे होण्याबरोबरच मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याचा धोकाही संभवतो.
ऑनलाईन पेमेंट करताना दक्षता घेणे खूपच गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा UPI पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका आणि कोणत्याही रिफंड सारख्या अमिषे असणाऱ्या लिंकवर क्लिक करण्याचे टाळावे.
खरेतर UPI पेमेंट करणे खूपच सोपे झाले आहे, परंतु त्याद्वारे होणाऱ्या फसवणुकींबद्दल बऱ्याचदा माहिती नसते. व्हाॅट्स अॅप तसेच विविध सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर केल्या गेलेल्या बनावट लिंक्स, चुकीचे QR कोड किंवा फोन कॉल्सद्वारे दररोज हजारो लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे, फसवणूक टाळण्यासाठी दक्ष आणि जागरूक राहूनच ऑनलाईन व्यवहार करायला हवेत.

यासाठी पुढील गोष्टी महत्वाच्या ठरतात ः
१) UPI पिन कोणालाही शेअर करू नका ः
प्रत्येक युजरला UPI चा स्वतंत्र पिन असतो आणि तो कधीही कोणाशीही शेअर करू नये. बँका आणि इतर सरकारी संस्था कधीही युजर्सना UPI पिन विचारत नाहीत. तसेच, पैसे रिसिव्ह करण्यासाठीही तुमचा पिन देण्याची गरज नाही. फसवणूक करणारे अनेकदा तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी कॉल किंवा मेसेजद्वारे तुमचा UPI पिनची मागणी करतात, आणि चुकून पिन शेअर केला की, मोठा आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कधीही कोणालाही UPI पिन शेअर करणे टाळा.
२) अनोळख्या लिंक्स करू शकतात घात ः
सध्या विविध प्लॅटफाॅर्मसवर रिफंड किंवा रिवॉर्डचा प्रचंड मारा सुरू आहे. आणि त्याला अनेक युजर्स भुलतात आणि त्याचा फायदा घेऊन फसवणूक केली जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळावे.
व्हॉट्सअॅप, एसएमएस अथवा सोशल मिडियावर पाठवलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळावे. या प्रकारच्या फिशिंग लिंक्स असता आणि त्यावर क्लिक केल्याने हॅकर्स तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करून तुमच्या UPI अॅप वापरण्याचा धोका बळावतो.
३) व्यवहार मर्यादा सेट करा
ऑनलाईन UPI पेमेंट अॅपमध्ये युजर्स त्यांच्या दैनंदिन व्यवहाराची मर्यादा सेट करू शकतात. त्यासाठी पेमेंट अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन रोजची ट्रान्झक्शनची मर्यादा सेट करता येते. यामुळे जरी कोणी तुमचे बँक अकाउंट किंवा डिव्हाइस हॅक केले तरी त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केल्यास तो अयशस्वी होईल.

४) QR कोड स्कॅन करण्यापूर्वी तपासा ः
सध्या QR स्कॅन करून पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यामध्ये फसवणुकीला अधिक वाव मिळू शकतो. कारण, बऱ्याचदा घाईगडबडीत QR कोड स्कॅन करून पेमेंट करून आपण मोकळे होत असतो. आणि पेमेंट योग्य व्यक्ती, दुकान अथवा संस्थेलाच झालेय अथवा नाही याची खात्री करत नाही. त्यामुळे फसवणूक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे QR कोड स्कॅन करताना, रक्कम आणि जो पेमेंट स्विकारणार आहे त्याचे नाव योग्य असल्याची खात्री करावी. बनावट QR कोड चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे जाऊ शकतात.
अनोळखी कॉल्स, सुचनांवर विश्वास ठेवू नका ः
डिजिटल अटक, KYC अपडेट्स किंवा लॉटरी जिंकण्याबद्दलचे कॉल्स तसेच मेसेज बनावट असतात. फसवणुक करणारे तुमचा OTP किंवा पिन विचारण्यासाठी अशा कॉल्सचा वापर करू शकतात. त्यामुळ अशा कॉल्स अथवा मेसेज पासून सावध रहा.
अधिकृत स्टोअर्समधून UPI अॅप्स डाउनलोड करा ः
विविध वेबसाईट्सवरून UPI डाऊनलो़ड करण्याच्या लिंक्स असतात, की फसव्या असू शकतात. त्यामुळे अधिकृत अॅप स्टोअर्समधून नेहमी UPI अॅप्स डाउनलोड करावे. अँड्रॉइड युजर्सनी Google Play Store वरून Google Pay, PhonePe आणि BHIM सारखी अॅप्स डाउनलोड करावीत. तर Apple युजर्सनी Apple App Store वरून Google Pay, PhonePe आणि BHIM सारखे अॅप्स डाउनलोड करावीत.
फसवणूक झाल्यास येथे संपर्क साधा :
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.