
अलीकडेच पोलिसांनी मथुरेतील देवसेरस गावात सायबर गुन्हेगारांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधले.कारवाईसाठी पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा गावाच्या वेशीवर दाखल झाला. यामध्ये आयपीएस अधिकारी, इन्स्पेक्टर आणि पोलिस आणि पीएसचे जवान असा सुमारे साडेचारशे जणांचा फौजफाटा होता. प्रथम पोलिसांच्या गाड्या गावापासून दूरवर लावण्यात आल्या. आणि पोलीस, जवान शेतातील बांधावरुन चालत गावात घुसले. छापामारी सुरु होताच गावात एकच खळबळ उडाली.
सायबर गुन्ह्यातील सहभागी सुमारे ४२ लोकांना ताब्यात घेतले, याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन १२० जण शेतातून पसार झाले. हे गुन्हेगार शेजारील हरयाणा आणि राजस्थानच्या दिशेने पळाले आहेत. त्यांना या गावातून राज्याची सीमा पार करण्यास काही मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात आहे.

मथुरेतील गावे का बनलीत सायबर गुन्हेगांचे केंद्र ?
मथुरा ही भगवान श्री कृष्णाच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. ऐतिहासिक वारसा असलेल्या गोवर्धनाच्या कणा-कणात भगवान श्रीकृष्ण वसले आहेत. मात्र, ही पवित्र भूमी अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे सायबर गुन्हेगारीचे हॉटस्पॉट. ही पवित्र भूमी गेल्या दोन वीस वर्षांपासून सायबर गुन्हेगारीचा जणू अड्डाच बनून आहे. मथुरेतील चार गावे हि हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामध्ये देवसेरस, मोडसेरस, मंडौरा आणि नगला मेव यांचा समावेश असून या गावांतील शेकडो तरुण शॉर्टकटने आणि झटपट पैसे मिळवून श्रीमंत होण्यासाठी सायबर गुन्हेगारीकडे वळले आहेत. हे तरुण ऑनलाइनच्या माध्यमातून देशभरातील लोकांची बँक अकाउंट्स रिकामी करत आहेत.

एका मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेच्या गोवर्धन येथे २० वर्षांहून अधिक काळापासून सक्रिय असलेल्या टटलू गँग सक्रीय आहे. या गँगने आतापर्यंत हजारो लोकांना लुटले आहे. आधी ही गँग स्वस्तातल्या सोन्याचे आमिष दाखवून लोकांना लुटायची. मात्र, गेल्या एक दशकापासून ही गॅंग सायबर गुन्हेगारीकडे वळली आहे. ही टोळी लोकांचे फेसबुक आणि इस्टाग्रामचे आयडी हॅक करण्यापासून बँक अकाउंटचा ओटीपी आणि अन्य डिटेल मिळवून फसवणूक करण्यात तरबेज झाली असून शेकडो तरुण यामध्ये सहभागी झाले आहेत.
देवसेरस हे संपूर्ण गावच सायबर गुन्हेगारांच्या नेटवर्कचे केंद्र आहे. या गावातील बहुतांश तरुण कोणत्या ना कोणत्या फसवणुकीच्या गुन्ह्याrत अडकले आहेत. यात मोठ्या संख्येने मेव समुदायाचा समावेश आहे. येथे गँगचे सदस्य गावाच्या बाहेर राहून सायबर फसवणुकीचे नेटवर्क चालवतात. आणि कारवाईसाठी पोलीस आले कि दुसऱ्या राज्यात पळून जातात.
पूर्वी ही टोळी पितळ हे सोने भासवून लोकांना लुटायची. मोठी संपत्ती असलेले, व्यापारी हे त्यांच्या टार्गेटवर आहेत. रोज नवनवीन फंडे वापरून हे गुन्हेगार लोकांना फसवत असून त्यांच्या बँक अकाउंटवरील रक्कम गायब करत आहेत.
आता एका दशकापासून या टोळीने डिजिटल जगात पाऊल ठेवले आहे. सायबर फ्रॉड करताना सोशल मीडिया अकाऊंटचे आयडी, पासवर्ड हॅक करुन कोणाच्या तरी नावाने पैसे मागणे, बँक कर्मचारी किंवा कंपनीचे प्रतिनिधी बनून कॉल करणे आणि ओटीपी मिळवणे आणि बँक अकाउंट रिकामी करणे याच हेतूने ते लोकांना टार्गेट करत आहेत.