
सध्या इंटरनेट जगतात सर्वत्र एकच नाव आहे, ते म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) किंवा ‘कॉकरोच’. भारताच्या सरन्यायाधीशांच्या एका कथित वक्तव्याच्या निषेधार्थ एक उपहासात्मक म्हणून सुरू झालेल्या या चळवळीने डिजिटल जगतात अक्षरशः धुमाकुळ घातलाच शिवाय संपूर्ण जगाला एआयची (AI) ताकदही दाखवून दिली. विशेष म्हणजे या तरूणाने एआयलाच आपले सर्वांत मोठे शस्त्र बनवले. अमेरिकेतील बोस्टन शहरात राहात असलेल्या अभिजीत दीपके या मराठमोळ्या तरूणाने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने कोणतीही कोडिंग न करता, केवळ एका तासात ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने आपली संपूर्ण वेबसाइट आणि एआय गीतही तयार केले. कॉकरोच जनता पार्टीची (CJP) संपूर्ण वेबसाइट तयार करण्यासाठी एआयचा वापर केला गेला. या वेबसाईटने असा काही धमाका केली की, अवघ्या काही दिवसांतच याचे फाॅलोअर्स तब्बल २.१५ कोटीवर पोहोचले आणि या पार्टीने देशातील प्रस्थापित भाजप, काँग्रेस सारख्या पक्षांनाही पछाडून जेरीस आणले.
चला घेऊयात, ‘कॉकरोच’ने एआयच्या केलेल्या वापराचा आढावा…
‘कॉकरोच’ हे प्रकरण नेमके आहे तरी काय?
‘कॉकरोच’ ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक व्यंगात्मक किंवा उपहासात्मक डिजिटल चळवळ किंवा मीम मोहीम आहे. आणि ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना ‘झुरळे’ संबोधल्याच्या कथित वक्तव्यानंतर मे २०२६ मध्ये सुरु झाली. सरन्यायाधीशांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिले, परंतु तरुण आणि बेरोजगारांनी हाच शब्द त्यांच्या निषेधाचे प्रतीक म्हणून वापरला आणि वेगाने व्हायरल होत गेला. खरेतर ‘कॉकरोच’ हा कोणताही निवडणूक पक्ष नाही किंवा याची निवडणूक आयोगाकडे नोंदणीही नाही.

‘कॉकरोच’चा हेतू काय?
देशातील बेरोजगारी, पेपरफुटी तसेच व्यवस्थेच्या दुर्लक्षाविरुद्धचा आपला संताप तसेच निराशा विनोदाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठीचे प्रामुख्याने तरुणांसाठीचे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. हा डिजीटल पक्ष कोणत्याही सामान्य व्यक्तीचे, बेरोजगाराचे किंवा निराश तरुणाचे स्वागत करतो. त्याच्या वेबसाइटवर सदस्यत्वासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत, उलट ती तरुणांचा असंतोष व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणून काम करण्याची मुभा देते.
या चळवळीने काय दाखवून दिले
‘कॉकरोच’ या संपूर्ण चळवळीने एक दाखवून दिले की, स्मार्टफोन, इंटरनेट अथवा वाय-फाय आणि चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या एआय टुल्सचा वापर करून कोणतीही व्यक्ती किंवा तरुण अगदी कमी वेळात इंटरनेटवर एक मोठी डिजिटल चळवळ उभी करू शकतात, एक मोठी ताकद निर्माण करू शकतात.
एका तासात बनवली वेबसाईट –
‘कॉकरोच’च्या वेबसाईटसाठी एआयचा वापर करून, ग्राफिक्स तयार करण्यासाठी फक्त एक प्रॉम्प्ट टाकला गेला आणि ते दोन मिनिटांत तयार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण वेबसाइट तयार करण्यासाठी फक्त एक तास लागला. एआयमुळे मोठी मेहनत वाचली आणि पुढीव गोष्टी अधिक सहज पद्धतीने करणे शक्य झाले.

वेबसाईटसह सोशल मिडियावरही धूम
‘कॉकरोचने केवळ वेबसाईटच नाहीतर इन्स्टाग्राम, एक्स सारख्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवरही धुमाकूळ घातला आहे, सोशल मिडियावरही फाॅलोअर्सचा अक्षरशः पाऊस कोसळू लागला आहे.
ही आहेत ‘कॉकरोच’ची सोशल मिडिया अकाउंटस्
वेबसाईट – https://cockroachjantapartyjoin.in/
इन्स्टाग्राम – @cockroachjantaparty
एक्स – सध्या हे अकाऊंट ब्लाॅक करण्यात आले आहे.
केवळ चार दिवसांत कमाल –
केवळ चार दिवसांत इंस्टाग्रामवर विक्रमी १ कोटी फॉलोअर्स मिळवणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल पक्षाने, कोणत्याही कोडिंगशिवाय, केवळ मजकूर आणि सूचनांचा वापर करून, अवघ्या एका तासात आपली संपूर्ण अधिकृत वेबसाइट आणि एआय गीत तयार करून तंत्रज्ञान जगताला चकित केले आहे.
काही सेकंदात बनवला लोगो, कंटेंट –
एआयच्या मदतीने काही सेकंदातच पक्षाचे लोगो, ग्राफिक्स आणि संपूर्ण वेब कंटेंट तयार केला. यामध्ये ChatGPT सारख्या एआय टुल्सचाही खुबीने वापर केला गेला. कमी मेहनत: यासाठी त्यांना कोडिंग किंवा वेब डिझायनिंगचे कोणतेही विशेष ज्ञान नसतानाही, केवळ योग्य प्रॉम्प्ट्स (Prompts) टाकून संपूर्ण वेबसाइट उभारता आली.
‘कॉकरोच’ची संकल्पना –
सायबर-कॉकरोच आणि एआय (Cyborg Cockroach Drones) वैज्ञानिक क्षेत्रात ‘कॉकरोच’ आणि एआयच्या संयोगातून एक अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. जर्मनी आणि इतर प्रगत देशांमधील तंत्रज्ञान कंपन्या खऱ्या कॉकरोचवर एआय आणि न्यूरल इंटरफेस (Neural Interfaces) बसवून त्यांना सायबर-इन्सेक्ट (Cyber Insect) किंवा ‘सायबोर्ग’ (Cyborg) बनवत आहेत. या कॉकरोचच्या पाठीवर छोटे सेन्सर आणि कॅमेरे बसवून त्यांना इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारे नियंत्रित केले जाते. हे कॉकरोच अरुंद जागेत, ढिगाऱ्यांखाली किंवा युद्धाच्या मैदानात सहज घुसून गुप्त माहिती आणि लाईव्ह डेटा एआय सिस्टीमपर्यंत पोहोचवू शकतात.

असे टूल्स वापरा, वेबसाईट बनवा –
‘कॉकरोच’च्या संकल्पनेने हेही दाखवून दिलेय की, कोडिंग शिकण्याची किंवा डेव्हलपरवर अवलंबून राहण्याची आता गरज नाही. आज अनेक एआय वेबसाईट बिल्डर्स तसेच UI (User Interface) टूल्स उपलब्ध आहेत की, जे केवळ एका टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे संपूर्ण वेबसाईट तयार करू शकतात. आणि, वेबसाईट तयार करण्यासाठी लागणारे प्रॉम्प्ट्ससुद्धा एआयकडूनच लिहून घेतले जाऊ शकतात. त्यासाठी
Framer AI, Dora, Realume.io and v0.dev या यासारखे एआय टूल्स उपयुक्त ठरणारे आहेत. या टूल्सचा वापर करून कोणीही काही तासांत संपूर्ण वेबसाईट लेआउट, यूआय डिझाइन, ॲनिमेशन्स तसेच पेजेस तयार करू शकतात.
आता पाहूया, ग्राफीक्स कसे तयार करायचे ते…
कोणत्याही सोशल मीडिया कँम्पेंनिंगसाठी आकर्षक ग्राफिक्स आणि व्हिज्युअल्स खूपच गरजेचे बनले आहे. ‘कॉकरोच’ने पारंपरिक डिझायनर्सऐवजी जनरेटिव्ह एआयचा वापर करून काही मिनिटांतच त्यांना लागणारे क्रिएटिव्ह ग्राफीक्स तसेच एआय इमेजीस तयार केल्या. त्यासाठी Canva AI, Midjourney, DALL-E 3, emergent, manus यासारख्या अॅडव्हान्स एआय टूल्सचा वापर केला.
अशाच एआय टूल्सचा वापर करून अतिशय कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळामध्ये सोशल मीडिया पोस्ट्स, लेआउट आणि बॅनर्स झटपट रिसाईज करण्याची तसेच एआय टेक्स्ट-टू-इमेज तयार केले. याशिवाय Suno AI/Udio सारख्या म्युझिक एआय टूल्सचा वापर करून, स्टुडिओशिवाय केवळ काही मिनिटांत ऑडिओ तयार केले आहेत.
ट्रेंड सुरू –
सोशल मिडियावर आता डिजीटल पक्ष स्थापनेचा आता नवा ट्रेंड सुरू झाला आहे, त्यात ओगी जनता पार्टीने एन्ट्री केली आहे. मात्र, ओगीने राजकीय पक्ष नसल्याचे म्हटले आहे. मीम्स आणि कार्टुन व्हायरल करून त्याद्वारे सध्या स्थितीवर भाष्य केले जात आहे.