परदेशातील नागरिकांकडून त्यांच्याच देशात ऑनलाइन लूट

सायबर गुन्हेगारीचा नवा चेहरा उघड !

सायबर गुन्हेगारीचा एक नवी काळी बाजू नुकतीच उजेडाली आहे. आत्तापर्यंत परदेशातील सायबर गुन्हेगार भारतातील नागरिकांना हाताशी धरून सायबर गुन्हे घडवून आणत होते. मात्र, या प्रकरणात परदेशातील नागरिकांना आयटी क्षेत्रात नोकरीच्या आमिषाने भारतात आणून त्यांच्या साहाय्याने त्यांच्या देशातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्याचा प्रकरण उघडकीस आले आहे. भारतातील पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवर नोएडामध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक आणि मानवी तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला असून, त्यामध्ये तब्बल १६४ परदेशी नागरिकांची सुटका केली आहे. यामध्ये ९२ इंडोनेशियन आणि ७२ मलेशियन नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून भारतात आणले गेले होते.

सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार –
भारताच्या ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वरील (NCRP) आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सायबर फसवणुकीच्या २८ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे २२,४९५ कोटी रुपयांचे (२.४२ अब्ज डॉलर्स) नुकसान झाले आहे. २०२१ च्या तुलनेत तक्रारींच्या संख्येत ४,००० टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली आहे. जुलैमध्ये लखनऊमध्ये पोलिसांनी एका बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा टाकून ११९ जणांना अटक केली होती. हे कॉल सेंटर अमेरिकेतील नागरिकांना टार्गेट करत असे. येथील कर्मचारी स्वतःला मोठ्या कंपन्यांचे किंवा अमेरिकन सरकारी संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असत.

असे दाखविले आमिष –
सोशल मिडिया आणि मेसेजिंग अॅप तसेच फोन काॅलच्या माध्यमातून इंडोनेशिया तसेच मलेशियातील नागरिकांना भारतात आयटीत चांगली नोकरी आणि मोठा पगार मिळेल, असे आमिष दाखवले. याला भूलून १६४ जण भारतात आले. भारतात आल्यानंतर या लोकांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आणि सुरू झाला खेळ, खेळ असा की मलेशिया आणि इंडोनेशियातील या नागरिकांना त्यांच्याच देशातील नागरिकांना फसवण्याचे काम देण्यात आले. छाप्यात मलेशियातील एका नागरिकाला अटक करण्यात आली. याबाबत दिल्ली पोलिसांकडे ई-मेलद्वारे या फसवणूकीची माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा पर्दाफाश झाला.

अशी केली फसवणूक –
एका बनावट नोकरी देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून मलेशिया तसेच इंडोनेशियातील नागरिकांना भारतात नोकरीसाठी आणले जात असे. हे दहा ते १५ जणांच्या ग्रुप संख्येने भारतात येत असत. भारतात आल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जमा करून घेऊन त्यांना पीजीमध्ये (पेईंग गेस्ट) ठेवले जात होते. या पीजीमध्ये जवळपास ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. की ज्याद्वारे या सर्व नागरिकांवर फसवणुकीचे नेटवर्क चालविणाऱे नजर ठेवत.


या सर्वांना एका बनावट काॅल सेंटरमध्ये नेले जात होते आणि त्या काॅल सेंटरमधून त्यांना त्यांच्याच देशातील लोकांना फसवण्याचे काम दिले जात होते. या नागरिकांना लिखित स्क्रिप्ट देऊन सोशल मिडिया तसेच मॅसेजिंग अॅपद्वारे लोकांशी कसे बोलायचे आणि त्यांचा विश्वास कसा संपादन करायचा, हे सांगितले जात असे. यासाठी महिलांच्या बनावट प्रोफाईलचा वापर केला जायचा. म्हणजेच सोशल मिडियावर महिलांच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले जायचे. आणि या अकाउंटद्वारे लोकांशी संपर्क साधला जायचा. आणि त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला जात असे. या जाळ्यात फसणाऱ्या लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले जायचे. यासाठी ट्रेडिंगचे बनावट प्लॅटफाॅर्म व वेबसाईट तसेच अॅप तयार करण्यात आले होते. शिवाय व्हाॅटस् अॅप ग्रुप तयार करून लोकांना टिप्स देऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. जेणे करून ही कंपनी अगदी खरी वाटावी.

असा झाला पर्दाफाश –
मलेशियातील एका नागरिकाला नोएडातील आयटी कंपनीत चांगली नोकरी देण्याचे सांगण्यात आले. तो नोएडातील सेक्टर ३६ मधील कंपनीच्या ऑफीसमध्ये गेल्यानंतर त्याला पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले, त्याला काहीतरी गडबड वाटली व त्याने पासपोर्ट जमा करण्यास नकार दिला आणि तो तेथून बाहेर पडला. त्यानंतर त्याने त्याने मलेशिया उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली तसेच दिल्ली पोलिसांच्या क्राईम बँचला ई-मेल पाठविला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *