
प्रत्येकवेळी बँकेत जाऊन चलन भरून तासनतास् रांगेत उभे राहून पैसे काढणे तसेच भरण्याचा त्रास एटीएम सुविधेमुळे कमी झाला, शिवाय बँकेचाही वेळ वाचला. बहुतांश ग्राहक हे एटीएमचा सर्रास वापर करताना दिसतात.आतातर युपीआय डिजीटल पेमेंट सुविधेमुळे एटीएममध्ये जाण्याचीही गरज उरलेली नाही, तरीही एटीएमचे महत्व आहेच. पण आपल्याला माहित आहे का, की एटीएममधूनच एटीएम कार्डचा वापर न करताही पैसे काढता येतात…
होय… आपल्यापैकी कमीच लोकांना माहिती आहे की तुम्ही तुम्ही UPI कोड स्कॅन करून डेबिट कार्डसारखे व्यवहार करू शकता. याचा अर्थ असा की जर तुम्हाला रोख रकमेची गरज असेल, तर तुम्ही UPI पद्धती वापरून ATM वरून पैसेही काढू शकता. असे करणे खूप सोपे आहेच शिवाय ते जास्त सुरक्षितही आहे, कारण सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठीही याचा उपयोग होत आहे. ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून अशा पद्धतीने पैसे काढू शकतो.
चला तर जाणून घेऊ, सोप्या पद्धतीने एटीएममधून एटीएम कार्ड न वापरताही युपीआयद्वारे पैसे काढायचे ते…

खरेतर युपीआय पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना आता बहुतांश बँकांनीही ग्राहकांसाठी त्यांच्या ATM मध्ये QR Code Scan किंवा UPI Money असे पर्याय देण्यास सुरुवात केली आहे. UPI च्या माध्यमातून ATM मधून पैसे काढणे फक्त सोपेच झालेले नाही तर हे कार्ड क्लोनिंग आणि स्कीमिंग सारख्या मोठ्या सायबर धोक्यांपासूनही सुरक्षित राहणे शक्य झाले आहे. त्यामुळे बँकांनाही एटीएममधूनच पैसे काढण्यासाठीचा हा पर्याय सोयीचा वाटू लागला आहे, शिवाय ग्राहकांनाही एटीएम कार्ड शिवाय एटीएम सेंटरमधूनच सहजपणे पैसे काढण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे.
आता पाहूया, याचे फायदे..
- एटीएममधून युपीआयद्वारे पैसे काढण्यासाठी फिजिकल डेबिट कार्ड जवळ नसले तरी चालू शकते
- एटीएम कार्ड हरवण्याची किंवा चोरीस जाण्याची भीती संपते
- एटीएम/डेबिट ‘कार्ड क्लोनिंग’ (कार्ड क्लोनिंग म्हणजे डुप्लिकेट, बनावट कार्डवर आवश्यक डाटा “कॉपी” करून कार्ड तयार करणे) अथवा ‘स्किमिंग’ (एटीएम स्किमिंग म्हणजे तुमचा कार्ड डाटा व पिन चोरण्यासाठी लपविलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होय) सारख्या धोकादायक सायबर फसवणूक पासूनही वाचवते
- ग्राहकाला त्याच्या बँकेच्याच नाही तर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून अशा पद्धतीने पैसे काढता येतात

UPI द्वारे पैसे काढण्याचे फायदे
UPI द्वारे पैसे काढण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुमच्याकडे कार्ड नसेल किंवा तुम्ही ते घरी विसरले असेल, तरीही तुम्ही आवश्यक असताना सहज ATM मधून रोखीने रक्कम काढू शकता. ही प्रक्रिया फक्त वेगवान नाही तर सोपीही आहे, कारण तुम्हाला वारंवार कार्ड घालावे किंवा PIN लपवून टाइप करण्याचा त्रास नाही. फक्त एक QR कोड स्कॅन केल्यावर तुमचे काम पूर्ण होते.
UPI द्वारे Cash कसे काढायचे, पाहूया..
- यासाठी सर्वप्रथम ATM मशीनजवळ जाऊन तिथे स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘UPI Cash Withdrawal’/’Cardless Cash’ या पर्यायाची निवड करावी (वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी सिस्टिम असू शकते).
- आता ATM मशीनमध्ये आवश्यक रक्कम टाईप करावी (नियमानुसार पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये)
- यानंतर ATM मशीनवर दिसणारा QR कोड, तो UPI ऍपद्वारे स्कॅन करा (जसे की BHIM, PhonePe, Google Pay, Paytm व अन्य). लक्षात ठेवा की हा QR कोड फक्त एकदाच वापरता येतो.
- संबंधीत बँकेशी लिंक असणारा फोनवरील UPI PIN टाका.
- PIN टाकताच तुम्हाला ATM मशीनमधून पैसे मिळतील.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- ATM वरून UPI द्वारे रोख रक्कम काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे:
- ATM मध्ये UPI फीचर उपलब्ध असले पाहिजे. त्याला तुम्ही मशीनमध्ये रोख रक्कम काढण्यासाठी दिलेल्या ऑप्शनमधून ही व्यवस्था आहे की, नाही हे ओळखू शकता.
याशिवाय, तुमच्याकडे तुमचा फोन आणि इंटरनेट असणे गरजेचे असून फोनमध्ये कोणतेही चालू UPI अॅप असले पाहिजे. तसेच ते अॅप अपडेटेड देखील असायला हवे. - येथे संपर्क साधा :
- ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी.
- प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
- केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.
