एकीकडे केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील व्यापारी, व्यावसायिकांना मात्र, एका वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. युपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट स्विकारून ते चांगलेच अडकले आहेत. या मनस्तापाशिवाय या व्यावसायिक, व्यापाऱ्यांना पोलिस ठाण्याच्या फेऱ्याही माराव्या लागत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्यात अडकलेल्या लोकांकडून नवी दिल्लीत व्यापारी तसेच व्यावसायिकांकडून खरेदी केल्यानंतर त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्यात आले. त्यानंतर ज्या व्यापारी, व्यावसायिकांना हे पेमेंट करण्यात आले, त्यांची बँक अकाउंट पोलिसांकडून गोठवण्यात (Freeze) आली आहेत. त्यामुळे या व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ही माहिती समजल्यानंतर गृह मंत्रालयाने बँक अकाउंट गोठवणे (Freeze) तसेच रक्कम अदा करण्याबाबत एसओपी (SOP – Standard Operating Procedure) जारी केला आहे.

नवी दिल्लीतील सदर बाजार परिसरातील अगरबत्ती तसेच धूप विक्रेता तसेच अन्य व्यावसायिक तसेच अन्य व्यावसायिकांच्या अकाउंटवर एका ग्राहकाने खरेदीनंतर युपीआय पेमेंट द्वारे रक्कम ट्रान्स्फर केली, ही रक्कम किरकोळ स्वरूपाची होती. ज्या ग्राहकाने खरेदीनंतर रक्कम युपीआयद्वारे विक्रेत्यांच्या अकाउंटवर पेमेंट केले आहे, तो सायबर गुन्हेगार असल्याचे सांगत पोलिसांनी या विक्रेते, व्यापाऱ्यांचे बँक अकाऊंट फ्रिझ केले. त्याचा मोठा फटका या व्यावसायिकांना बसला असून त्यांच्या अकाउंटवरील करोडोंची रक्कम ब्लाॅक झाली. त्यामुळे व्यवसायातील देव-घेव ठप्प झाली असून व्यवसायावर मोठा परिणाम झाला.
पोलिस ठाण्यात फेऱ्या मारून विनवणी केल्यानंतर शाहनिशा करण्यात आल्यानंतर त्यांचे फ्रिझ केलेले अकाउंट पुन्हा सुरू करून देण्यात आले. मात्र, या किरकोळ युपीआय व्यवहाराने कारण नसताना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याने या व्यावसायिक, व्यापाऱ्यांवर युपीआय पेमेंट नको रे बाबा अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
या बरोबरच अन्य ठिकाणीही सायबर गुन्हेगारांवर कारवाई करताना त्यांनी ज्या ज्या व्यावसायिकांशी व्यवहार केलेत त्यांचे अकाउंट फ्रिझ करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सराफ व्यावसायिकांचाही समावेश असून त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. त्यानंतर दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांचे अकाउंट या व्यावसायिकांना पुन्हा बहाल करण्यात आले.दरम्यान, गृह मंत्रालयाने बँक अकाउंट फ्रिझ करणे तसेच रक्कम अदा करण्याबाबत एसओपी (SOP – Standard Operating Procedure)जारी केला आहे. व्यापारी, व्यावसायिकांनी या एसओपीमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

व्यावसायिक काय म्हणत आहेत…
- व्यवहार करताना कोणताही ग्राहक हा सायबर गुन्हेगार आहे, हे ओळखणे शक्य नसते. मग आमची चूक कशी ?
- अशा घटना घटल्यास सायबर गुन्हेगाराने जेवढी रक्कम युपीआयद्वारे पाठवली आहे, तेवढीच फ्रिझ केली जावी. संपूर्ण अकाउंट ब्लाॅक करू नये.
- युपीआय फ्राॅडमध्ये संपूर्ण चेन फ्रिझ करण्याऐवजी संबंधीत व्यवहारावरच कारवाई केली जावी.
- सायबर गुन्हेगारांची माहिती तसेच युपीआय अकाउंटचा तपशील व्यावसायिक, व्यापाऱ्यांना दिला जावा, जेणेकरून अशा गुन्हेगारांशी व्यवहार करणे टाळता येईल.
- एसओपीमध्ये ९० दिवसांपर्यंत बँक अकाउंट फ्रिझ करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवसायच ठप्प होतो. त्याऐवजी तो कालावधी १५ दिवसांचा केला जावा.

आता पाहूया, एसओपी काय आहे ?
सायबर गुन्ह्यांमध्ये एसओपी (Standard Operating Procedure) म्हणजे सायबर गुन्ह्यांचा तपास, पुरावे गोळा करणे आणि पीडितांना मदत करण्यासाठी पोलीस व तपास यंत्रणांनी पाळायची Step-by-Step नियमावली होय. यामध्ये फसवणूक झाल्यास १९३० या टोलफ्री नंबरवर कॉल करायची तसेच सायबर गुन्हे पोर्टलवर (cybercrime.gov.in) तक्रार नोंदवणे, बँक खाती त्वरित फ्रीझ करणे आणि डिजिटल पुरावे जसे ट्रान्जक्शनचे स्क्रिनशाॅट, रिसिट तसेच अकाउंट स्टेटमेंट पोलिसांना पुरवणे, यांचा समावेश असतो.
बँक अकाउंट फ्रिझ झाल्यास पुढील गोष्टी करा..
- बँकेत जाऊन अकाउंट फ्रिझ झाल्याचे कारण, तक्रार नंबर तसेच एजन्सीजचा तपशील घ्यावा
- सायबर सेलशी संपर्क साधून बँकेतून घेतलेला तपशील सादर करावा
- सरकारने जारी केलेल्या १९३० या टोलफ्रि नंबरवर अथवा सायबर गुन्हे पोर्टलवर (cybercrime.gov.in) तक्रार नोंदवावी
- व्यवहाराच्या तपशीलाचे स्क्रिनशाॅट जसे स्क्रिनशाॅट, रिसिट तसेच अकाउंट स्टेटमेंट काढून ठेवावेत व ते आवश्यक त्यावेळी पोलिसांना पुरवावेत.
