हव्या असलेल्या वस्तू अगर गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. भारतात आर्थिक आकांक्षा सतत वाढत असताना, कर्जे ही व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारी आवश्यक साधने बनली आहेत. मग ते पर्सनल, घर, जमीन, वाहन खरेदी असो कि घरगुती वस्तू, उपकरणे असोत. सर्व सामान्य, मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत असे सर्वच जण वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेत असतात.
बँकांची कर्ज देण्याचे नियम, प्रक्रिया, कागदपत्रांची जुळवाजुळव यामुळे झटपट कर्ज देणाऱ्या खासगी बँक, पतसंस्था, अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था, फायनान्स कंपन्याकडे ओढा वाढला आहे. कर्ज पुरवठा करणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आल्या, कमी व्याजदरात आकर्षक कर्ज, सवलतींची जाहिरात करून लोकांना आकर्षित केले गेले. त्यातूनच काहींनी फसवणुकीचा धंदा सुरु केला. आजकाल ऑनलाईन व्यवहारांमुळे ३० मिनिटात कर्ज, काही वेबसाईटच्या माध्यमातूनही ऑनलाईन कर्ज ऑफर केले जाते. कागदपत्रांशिवाय अगदी १० हजारांपासून ४० ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्याच्या जाहिरातीकडेही लोक आकर्षित होत असतात.
अलीकडच्या काळात कर्जाच्या वाढत्या मागणीसह, कर्ज फसवणुकीचा धोका देखील वाढला आहे. काही व्यक्ती अगर बनावट संस्था कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत आहेत. झटपट कर्ज, कमी व्याजदर, कोणत्याही कागदपत्रांशिवाय अगर दोन-तीन कागद्पत्राद्वारे कर्ज मंजुरी असली आमिषे दाखवून लोकांना भुलवून फसवणूक केली जात आहे. यातून लोक त्यांचे कष्टाचे पैसे गमवत आहेत. त्यामुळे कर्ज घेताना कोणत्याही आमिषाला न भुलता दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.

कर्ज फसवणूक म्हणजे काय?
कर्ज फसवणुकीमध्ये फसव्या पद्धतींचा समावेश असतो जिथे फसवणूक करणारे व्यक्तींना वैयक्तिक माहिती किंवा पैसे देण्यासाठी खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या कर्ज सेवा देतात. हे फसवणूक करणारे अनेकदा कायदेशीर कर्जदाते किंवा आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात, निधी जलद आणि सहज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतात. बनावट कर्ज ऑफरमध्ये वैयक्तिक, व्यवसाय आणि अगदी शैक्षणिक कर्जे देखील समाविष्ट असू शकतात.
बँका अगर पतसंस्थांमधून कर्ज मिळवून देतो असे सांगून एजन्ट असल्याचे भासवूनही फसवणूक केली जात आहे. ज्यांना झटपट कर्ज हवे असते, किंवा ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतात, ते असे शॉर्टकट मार्ग अवलंबतात आणि फसतात.
कर्जासाठी अर्ज करताना लोकांची कशी फसवणूक होते?
कर्ज घोटाळेबाज त्यांच्या पीडितांना फसवण्यासाठी विविध युक्त्या वापरतात.
१. आगाऊ शुल्क घोटाळे
अॅडव्हान्स शुल्क फसवणुकीमध्ये, फसवणूक करणारे कर्ज देण्यापूर्वी आगाऊ शुल्क मागतात. ते अनेकदा असा दावा करतात की ही फी कर, विमा किंवा प्रक्रिया शुल्कासाठी आहे. संबंधित व्यक्तीने रक्कम भरल्यानंतर फसवणूक करणारा गायब होतो आणि कर्ज कधीच वितरित केले जात नाही.
२. फिशिंग घोटाळे
फिशिंग घोटाळ्यांमध्ये फसवणूक करणारे कायदेशीर कर्ज पुरवठादार असल्याचे भासवतात. ते बँक खात्याचे तपशील, पॅन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारतात. नंतर ही माहिती पीडिताची ओळख चोरण्यासाठी आणि इतर फसवणुकीसाठी वापरली जाते.
३. बनावट कर्ज ऑफर
काही फसवणूक करणारे कमी व्याजदर, लवचिक परतफेड पर्याय, त्वरित मंजुरी आणि किमान कागदपत्रे अशा आकर्षक अटींसह बनावट कर्जांची जाहिरात करतात. बरेच जण कायदेशीर दिसण्यासाठी व्यावसायिक दिसणाऱ्या वेबसाइट देखील तयार करतात. एकदा व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते की, बेकायदेशीर कृत्यांसाठी त्यांची वैयक्तिक माहिती चोरतात.

फसवणूक होण्याची लक्षणे :
कर्ज प्रक्रियेबाबत जागरूक राहिल्यास फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचता येते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
१. त्वरित कर्ज मंजुरीचे आश्वासन :
जर कर्ज ऑफरमध्ये क्रेडिट, चेक, त्वरित मंजुरी आणि अत्यंत कमी व्याजदराचे आश्वासन दिले गेले तर ते कदाचित घोटाळा असू शकतो. कायदेशीर कर्ज देणारे कर्ज मंजूर करण्यापूर्वी नेहमीच तुमची क्रेडिट पात्रता, कर्ज फेडीची क्षमता तपासतात आणि पडताळणीशिवाय मंजुरीची हमी देत नाहीत.
२. आगाऊ शुल्क मागणी :
खरे कर्ज देणारे कर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी कोणतेही पैसे मागत नाहीत. प्रक्रिया शुल्क, प्रशासकीय शुल्क किंवा इतर कारणांसाठी आगाऊ पैसे मागणाऱ्या कर्जदारांपासून सावध राहिलेलेच बरे.
३. दबाव तंत्राचा वापर :
फसवणूक करणारे अनेकदा निकडीची भावना निर्माण करतात, तुमच्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी दबाव टाकतात. अशा कर्जदारांपासून सावध रहावे, कि जे तुम्हाला तपशीलांचा रिव्ह्यू करण्यासाठी पुरेसा वेळ न देता कागदपत्रे त्वरित पूर्ण करण्यास भाग पाडतात.
४. बोगस संपर्क क्रमांकापासून सावध :
कायदेशीर कर्ज देणारे अधिकृत ईमेल किंवा वेरिफाईड सोर्सकडून आलेले मेसेज यासारख्या सुरक्षित कम्युनिकेशन माध्यमांचा वापर करतात. वैयक्तिक ईमेल अकाउंटद्वारे किंवा वेरिफाइड न केलेल्या फोन नंबरद्वारे तुमच्याशी संपर्क साधणाऱ्या कर्जदारांशी व्यवहार करणे टाळा.
५. अधिकृत तसेच खरा पत्ता :
खऱ्या कर्जदात्याकडे नेहमीच पडताळणीयोग्य कार्यालयीन पत्ता असतो. जर कर्जदाता कायदेशीर व्यवसाय पत्ता देऊ शकत नसेल तर तो धोक्याचा इशारा समजावा.

फसवणूक झाल्यास हे करा :
फसवणूक होत आहे किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने पुढील पावले उचलणे आवश्यक ठरते :
१. अधिकाऱ्यांकडे तक्रार करा
जर कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास संबंधित अधिकार, पोलीस यांच्याकडे तातडीने तक्रार दाखल करावी.
२. बँकेला कळवा
जर फसवणूक करणाऱ्याकडे कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर केली असेल, तर तुमच्या बँकेला ताबडतोब कळवून अकाऊंटवरून होणारे व्यवहार थांबवण्यास सांगावे. ज्यामुळे बँक तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी आणि पुढील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पावले उचलू शकते.
३. स्पष्ट नोंदी ठेवाव्यात :
फसवणूक करणाऱ्याशी पूर्वी झालेल्या सर्व संवादांचे रेकॉर्ड ठेवा, ज्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग, ईमेल, व्हॉट्सअँप मेसेज, ऑनलाईन पेमेंटचे स्क्रिनशॉट व पेमेंटच्या पावत्या यांचा समावेश आहे. हे रेकॉर्ड पोलिसांना फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास मदत करू शकतात.
४. इतरांनाही सावध करावे :
सामान्य कर्ज घोटाळ्यांबद्दल जागरूक राहिल्याने तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. याबाबत अधिकृत मिळणारी माहिती, अलर्ट आणि सूचना नियमितपणे वाचा व इतरांनाही याबाबत सावध राहण्यास सांगावे.
कर्ज घेण्यापूर्वी या टिप्स पहा :
कर्ज फसवणुकीला बळी पडण्यापासून बचाव करण्यासाठी, पुढील टिप्स फॉलो करा:
1. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, कर्ज देणारी संस्था अधिकृत आहे का याची पडताळावी करावी, त्यांच्याकडे सर्व योग्य कागदपत्रे आहेत याची खात्री करा.
2. कर्ज घेताना फोन कॉल, ईमेल किंवा व्हाट्सअप वरून वैयक्तिक, संवेदनशील माहिती शेअर करणे टाळावे.
3. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी, कर्जाच्या अटी आणि शर्ती नेहमी वाचा आणि समजून घ्याव्यात.
4. तुमच्यापर्यंत अनपेक्षित कर्ज ऑफर किंवा आमिष दाखविणाऱ्या कर्जदारांशी संपर्क करणे टाळावे
5. कर्ज घेताना काही चुकीचे किंवा संशयास्पद वाटत असेल पुढील प्रक्रिया तात्काळ थांबवावी.
बोगस कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक करणारी गजाआड, बिंग कसे फुटले?
पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही. मुंबईत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. मुंबईत एका टोळीने खोटी आणि बोगस कागदपत्रं बनवून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवलं. या कर्जाच्या पैशातून नामांकित कंपन्यांची मोटार वाहने खरेदी केली. त्या वाहनांची देशातील वेगवेगळ्या राज्यात विक्री केली. ती वाहनं गहाण ठेवून बँकांची आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केलीय. मात्र याबाबत एक तक्रार आल्यानंतर सापळा रचत या टोळीला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा 3 ने अटक केलीय.
सात आरोपींना अटक : दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. टोळीतील आरोपींनी बनावट आधार कार्ड बनविणे, वाहनांचे आरसी बुक बनविणे, एमएमआरडीएचे अलॉटमेंट लेटर बनविणे, बँक स्टेटमेंट बनविणे, आयकर विवरणपत्रे तयार करून त्याच्या माध्यमातून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवले होते. ही टोळी वाहन कर्ज मिळवून महागड्या मोटार वाहन खरेदी करत होती आणि ही महागडी वाहनं देशातील विविध राज्यांमध्ये आरसी बुकच्या आधारे विकत होती. चोरीच्या गाड्यांमध्ये बदल करून त्या गाड्यांची विक्री करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रकरण कसे समोर आले? : 24 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदीप शर्मा या व्यक्तीने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल कंपनीकडून महिंद्रा थार ही गाडी घेण्यासाठी कर्ज घेतले. त्यासाठी त्याने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार केली. यावेळी त्याने 16,03,627 रुपये इतके कर्ज बँकेकडून मंजूर करून घेतले. मात्र ही बाब महिंद्रा कंपनीच्या लक्षात आली. यानंतर प्रदीप शर्माने कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या कक्ष 3 च्या तपास पथकाने सखोल तपास सुरू केला आणि ही आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांना सापळ रचला आणि या टोळीला पोलिसांना गजाआड केले.
दरम्यान, तक्रारीनंतर अन्वये भादंवि कलम 420, 468, 471, 120(2), 34, 406, 465, 467 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांना या आंतरराज्यीय टोळीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून विविध कंपनीच्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी इंदुर, मध्य प्रदेश, मुंबई, ठाणे, गुजरात येथे शोधमोहीम राबवून 7 आरोपींना अटक केलीय. आरोपींकडून आतापर्यंत 16 विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्यात. याची किंमत सुमारे 7 कोटी 30 लाख 28 हजार रुपये आहे. दरम्यान, असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांना केलंय.
ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून बचावासाठी Law Enforcement Agency आणि सरकारी संस्था सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत, फ्रॉड फोन नंबर ब्लॉक केले आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रकरणांचा तपास करत आहेत. तथापि, या फसवणुकीबाबत जागरूक राहणे आणि सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.