रोख अथवा एटीएम मध्ये जाण्याच्या त्रासातून सुटका आणि तात्काळ पेमेंटच्या सुविधेमुळे डिजिटल अथवा QR कोडद्वारे (क्विक रिस्पॉन्स कोड) पेमेंट ही सध्या व्यवहारात सर्वात लोकप्रिय पद्धत झाली आहे. आज पावलोपावली क्यूएआरकोडचा वापर होताना दिसत आहे, अगदी टपरीवर चहा, भाजी खरेदी असो कि अगदी एक-दोन रुपयांची वस्तू असो क्यूएआर (QR) कोड स्कॅन करून पैसे आदा करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अगदी किरकोळ दुकानदार, टपरी ते मोठमोठे मॉल अशा सर्वच ठिकाणी ही सुविधा दिसत आहे. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंटद्वारे फसवणूक होण्याचे प्रकारही वाढत असून पेमेंट करताना काही काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. यामध्ये थोडीशी चूक महागात पडू शकते.

QR कोड म्हणजे काय ?
QR कोड हा पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा बारकोड असतो. यात पांढऱ्या बॅकग्राऊंडवर चौकोनी ग्रिडमध्ये मांडलेल्या काळ्या बॉक्सचा पॅटर्न असतो. स्मार्टफोन कॅमेरा सारख्या इमेजिंग डिव्हाईसने हा QR कोड स्कॅन केला जातो. QR हा ‘image-based hypertext link’ असतो, ज्याचा वापर ऑफलाइन मोडमध्येही करता येतो. यामध्ये कोणतीही URL एन्कोड करता येते.
लोक विविध प्रकारचे QR कोड वापरू शकतात. जसे कि एक QR कोड असा असतो, ज्यामध्ये व्यापारी रक्कम निश्चित करू शकतो, ग्राहकाने ती स्कॅन करताच, त्याला निश्चित रक्कम भरण्याचा पर्याय मिळतो. किंवा अनेक प्रकरणांमध्ये ग्राहक कोड स्कॅन केल्यानंतर रक्कम टाकतात.
आता पाहू या, QR कोड द्वारे पेमेंट कसे होते ते..
दुकानदार आपल्या व्यवसायासाठी एक विशिष्ट QR कोड तयार करतो. हा कोड त्यांच्या दुकानाच्या ठिकाणी, बिलवर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डिस्प्ले केला जातो. ग्राहक स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने किंवा पेमेंट अॅप वापरून दुकानदाराचा हा QR कोड स्कॅन करतो. स्कॅन केल्यानंतर, ग्राहकाला पेमेंट अॅपवर रक्कम भरण्यास सांगितले जाते. ग्राहक त्याच्या पेमेंट सिस्टीमशी जोडलेल्या बँक अकाउंट किंवा डिजिटल वॉलेटमधून रक्कम देण्यासाठी परवानगी देतो. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, ग्राहकाला आणि दुकानदाराला पोच मिळते.

आता पाहूया, क्यूआर कोडद्वारे फसवणूक कशी होते ते…
बनावट क्यूआर कोड :
फसवणूक करणारे लोक बनावट क्यूआर कोड बनवतात आणि ते आपल्याला स्कॅन करण्यास सांगतात. जेव्हा आपण हा कोड स्कॅन करतो, तेव्हा आपले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. बर्याचवेळा हॅकर्स ई-मेलवरून QR कोड पाठवतात, की पेमेंट अनसक्सेसफुल झाल्यास, ते येथून पूर्ण करावयास सांगितले जाते. अशा इ-मेलकडे दुर्लक्ष करावे. त्यात येणारा QR कोड स्कॅन करण्याचे टाळावे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
फसवणूक करणारी वेबसाइट:
कधीकधी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर आपल्याला एका बनावट वेबसाइटवर ‘रिडायरेक्ट’ केले जाते. या वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटची माहिती किंवा इतर महत्त्वपूर्ण माहिती भरण्यास सांगितले जाते.
फसवणूक करणारे अँप्स :
कधीकधी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर आपल्याला फसवणूक करणारे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हे अॅप आपल्या फोनमधील माहिती चोरून घेऊ शकते.
अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक :
समजा QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला एखादे अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक आली असेल, तर त्यातून ताबडतोब बाहेर पडावं. जे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे, त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमध्ये असलेल्या पैशांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

क्यूआर कोड वापरताना काळजी घेण्यासाठी काही टिप्स:
QR कोड स्कॅन करण्यापूर्वी कोडमध्ये बदल झालेला नाही याची खात्री करावी. जसे कोडवर स्टिकर लावले आहे का पहावे. तसेच कोड स्कॅन केल्यावर ज्याला पाठवायचे त्याचे नाव तपासावे. सगळ्यात महत्वाचे हे समजून घ्यावे कि, QR कोड स्कॅनचा वापर हा दुसऱ्याला पैसे पाठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे पैसे स्विकारण्यासाठी त्याचा वापर होत नाही. जर तुम्हाला पैसे देणारा QR कोड स्कॅन करण्यासाठी ई-मेल अथवा मेसेज पाठवत असेल, तर त्यावर क्लिक करू नका.
- पैसे पाठवायच्या वेळीच पिन टाकावा : क्यूआर कोड स्कॅन करत असला तरीही, जोपर्यंत तुम्हाला पैसे पाठवायचे नाहीत तोपर्यंत तुमचा यूपीआय पिन टाकू नये.
- क्यूआर कोडची पडताळणी करावी : कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी, त्याची पडताळणी करावी. कोड स्पष्ट असून वाचता येणे योग्य आहे कि नाही ते पाहावे. कोणतेही स्पेलिंग एरर किंवा इतर चुका नाहीत ना याची खात्री करावी.
- विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी : साहित्याची खरेदी करताना शक्यतो विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच पेमेंट करताना दक्षता घ्यावी.
- फोनमध्ये सुरक्षित पेमेंट अॅप वापरावे : ऑनलाईन व्यवहारांसाठी फोनमध्ये एक सुरक्षित पेमेंट अॅपचा वापर करावा. तसेच त्यावर पेमेंटचा तपशील, हिस्ट्री पाहत राहावी.
- आपल्या अकाउंटवर नजर ठेवावी :
- तुमच्या बँक अकाउंटवर नियमितपणे नजर ठेवत राहावे. कोणतेही अनधिकृत व्यवहार झाल्याचे जाणवल्यास, त्वरित आपल्या बँकेला कळवावे.
- शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप किंवा अन्य कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या दुकानात QR कोड स्कॅन करताना अत्यंत काळजीपूर्वक करावे, स्कॅन केल्यानंतर होणारी प्रत्येक प्रोसेस बारकाईने पाहावी.
- बँकेची SMS सेवा सुरु ठेवावी, जेणेकरून ऑनलाईन व्यवहार झाल्यानंतर अकाउंटवर पैसे आल्याचे अथवा कट झाल्याचा SMS बँकेकडून येईल.
- क्यूआर कोड फसवणुकीचे बळी ठरला तर पुढील उपाय करा :
- आपल्या बँकेला त्वरित कळवावे : फसवणूक झाल्याचे जाणवताच त्वरित आपल्या बँकेला कळवावे.
- पोलिसांकडे तक्रार दाखल करावी : फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करावी.
- सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षा वाढवावी : तुमचे सोशल मीडियावरील अकाउंटसची सुरक्षा वाढवावी. अकाउंटचा पासवर्ड कोणालाही शेअर करणे टाळावे.
- फोनमधील अॅप्स अपडेट करत राहावे : आपल्या फोनमधील अॅप्स अपडेट करत राहावे.
ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.