सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. त्यामध्ये ‘सिम स्वॅप’ हा फसवणुकीचा प्रकारही बऱ्याचवेळा अवलंबला जात आहे. यामध्ये अनोळखी फोन नंबर्सवरून कॉल येतात. आणि जेंव्हा चेक केले जाते, त्यावेळी बँक अकाउंटमधून पैसे गायब झालेले असतात. या फसवणुकीत कोणालाही फोन केलेला नसतो, ओटीपी शेअर केलेला नसतो किंवा कोणालाही बँक अकाउंटची माहिती दिलेली नसते, तरीही तुमच्या परस्पर पैसे कट होतात. ही फसवणुक कोणासोबतही होऊ शकते.

आता पाहूया, ही सिम स्वॅप फसवणूक काय आहे ?
‘सिम स्वॅप’ फसवणूक म्हणजे, अशी फसवणूक असते कि ज्यामध्ये फसवणूक करणारा किंवा हॅकर्स एखाद्या व्यक्तीच्या सिम कार्डची माहिती मिळवून, त्याच्या मोबाईल नंबरचे डुप्लिकेट सिम कार्डचा वापरतो. या फसवणुकीला पोर्ट-आउट स्कॅम, डिजिटल सिम स्वॅप, सिम स्प्लिटिंग किंवा सिमजॅकिंग असेही म्हणतात.
आजच्या डिजिटल युगात बँकेचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहजपणे पैशांची देव-घेव करण्याच्या पद्धतीमुळे बँकिंग अँप, गुगल पे, फोन पे सारख्या पेमेंट अँपच्या साहाय्याने करण्याचे प्रमाण वाढले आहे.
या पद्धतीमध्ये बँक अकाउंट थेट लिंक सिमकार्डशी (मोबाईल नंबर) लिंक असते, पैसे पाठविताना ओटीपी पाठवला जातो, तो ओटीपी दिल्यानंतरच पैसे पेड (Paid) होत असतात. हॅकर्स याच सिम कार्डद्वारे फसवणूक करतात.
यासाठी हॅकर्स सुरवातीला तुमची वैयक्तिक माहिती जसे तुमचा फोन नंबर, पत्ता तसेच बँक अकाउंट डिटेल्स माहित करून घेतात. आणि त्याचा वापर हा फसवणुकीसाठी करतात.
यासाठी हॅकर्स जी पद्धत अवलंबतात, ती म्हणजे ‘फिशिंग’. आता ‘फिशिंग’ म्हणजे काय, तर आपण बऱ्याचदा इंटरनेटवर असंख्य वेबसाईट्स पाहत असतो, काही खरेदीही करत असतो. अशावेळी आपण आपली वैयक्तिक माहिती तसेच बँक डिटेल्स भरतो. हॅकर्स अशी हुबेहूब वेबसाईट तयार करतात, कि ती बनावट वाटत नाही. त्याची लिंक पाठवली जाते. आणि डिटेल्स भरायला सांगितले जाते. आपण ती खरी वेबसाईट समजून वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स भरतो. याशिवाय काही वेबसाईटवर आपण वैयक्तिक माहिती भरलेली असते, कि ज्याचा शोधही हॅकर्स घेत असतात.
सिम स्वॅप फसवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे सिम कार्ड हरवल्याचे सांगून नवीन सिम घेतले जाते. मात्र, हे सोपे नाही, यासाठी मोबाईल कंपनीतील एखादा कर्मचारी अथवा अधिकारी या हॅकर्ससोबत असतो. त्याला हाताशी धरून डुप्लिकेट सिम तयार केले जाते. आणि एकदा का हे डुप्लिकेट सिम ऍक्टिव्ह केले कि, ओरिजनल सिम हे आपोआप डि-ऍक्टिव्ह होते. यानंतर बँकेचे ओटीपी, ट्रान्जक्शन मेसेज हे या डुप्लिकेट सिमवर येण्याचा मार्ग मोकळा होतो.

डुप्लिकेट सिम ऍक्टिव्ह करण्यापूर्वी हॅकर्स हे ओरिजिनल सिमकार्डवर अनोळखी नंबरवरून दोन-तीन अथवा अधिक वेळा मिस्ड कॉल करतात. जेंव्हा समोरचा फोन उचलतो अथवा कॉल बॅक करतो तेव्हा, तेव्हा हॅकर्सकडून कोणताही रिस्पॉन्स दिला जात नाही. अशावेळी बऱ्याचदा आपण वैतागून तो फोन बंद करतो अथवा फोन सायलेंटवर टाकतो. तुम्ही काही वेळ फोनपासून दूर राहावे, हेच हॅकर्सला हवे असते. कारण फोन तुमच्या जवळ असला आणि एकदम नेटवर्क गेल्यास, काहीतरी गोंधळ असल्याचे लगेच तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही काही वेळ त्या फोनपासून दूर राहण्यासाठी असे केले जाते.
त्यानंतर डुप्लिकेट सिम ऍक्टिव्ह करून बँकेतून ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर करून ओटी[पी टाकून पैसे काढून घेतले जातात.
दुसरीकडे आपल्या सिम कार्डवरील नेटवर्क गेल्याचे लक्षात आल्यानंतर आपण काहीतरी नेटवर्कचा इश्यू असल्याचे समजतो आणि मोबाईल कंपनीत गेल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येतो.
सिम स्वॅप फसवणूक कशी होते:
– फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी इ. गोळा करतात.
– त्यांनी गोळा केलेली माहिती वापरून ते तुमच्या मोबाइल ऑपरेटरशी संपर्क करतात आणि तुमचे सिम कार्ड बदलण्याची विनंती करतात.
– फसवणूक करणारे तुमच्या नावावर त्याच नंबरचे डुप्लिकेट नवीन सिम कार्ड मिळवतात.
– नवीन सिम कार्ड मिळाल्यानंतर ते तुमच्या बँक खात्यातून ओटीपी वापरून पैसे काढून घेतात.

काय काळजी घ्यावी
– तुमच्या मोबाईल ऑपरेटरकडून अतिरिक्त सुरक्षा सुविधा घ्या, जसे की सिम लॉक, कॉल वेरिफिकेशन इ.
– कोणत्याही वेबसाईटवर माहिती भरताना ती अधिकृत आहे, का याची खात्री करावी
– नेटबँकिंग अथवा इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर नियमितपणे पासवर्ड बदलत राहावे
– बराच वेळ मोबाईल नेटवर्क येत नसल्यास मोबाईल ऑपरेटर्सशी संपर्क करून माहिती घ्यावी
– मोबाईलवर डुप्लिकेट सिम कार्ड विषयी काही मेसेज आलाय का तपासावे
– बँकिंग व्यवहाराशी संबंधित माहिती मिळण्यासाठी एसएमएस (SMS) सोबतच ई-मेल अलर्ट ऍक्टिव्ह करावा जेणे करून सर्व बँक व्यवहाराशी संबंधित अपडेट ई-मेलवरही मिळेल
– तुमच्या बँक खात्याची नियमितपणे तपासणी करा आणि कोणतीही अनधिकृत व्यवहार झाले आहेत का ते पहा.
– फसवणुकीचा व्यवहार झाल्याचे लक्षात येताच सर्व प्रथम बँकेशी संपर्क साधून माहिती द्यावी, जेणेकरून बँक अकाउंट ब्लॉक केले जाईल आणि पुढची फसवणूक थांबेल.
सिम स्वॅप फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सावधगिरी बाळगणे. तुमची वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका आणि कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजला उत्तर देऊ नका.
– ‘सिम स्वॅप’ फसवणूक झाली असेल, तर तात्काळ तुमच्या बँकेला आणि मोबाइल ऑपरेटरला कळवा.
येथे संपर्क साधा :
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.