इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) विंगला या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 1,203 कोटी रुपयांच्या डिजिटल फसवणुकीच्या एकूण 4,599 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच 14,204 कोटी रुपयांच्या व्यावसायिक घोटाळ्याच्या 20,043 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मे 2024 पर्यंत दररोज सरासरी 7,000 हून अधिक तक्रारी दाखल होत आहेत. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) चे सीईओ राजेश कुमार यांनी ही माहिती दिली.

भारताला लक्ष्य करणारे बहुतेक सायबर फसवणूक करणारे हॅकर्स हे प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशियातील प्रमुख ठिकाणी कार्यरत आहेत. यात कंबोडियातील पर्साट, कोह काँग, सिहानोकविले, कंडल, बावेट आणि पोइपेट, तर थायलंड आणि म्यानमारमधील म्यावाड्डी आणि श्वे कोक्को यांचा समावेश आहे.
या वर्षी सायबर फसवणुकीच्या बहुतांश घटना या बनावट ट्रेडिंग ॲप्स, लोन ॲप्स, गेमिंग ॲप्स, डेटिंग ॲप्स आणि अल्गोरिदम मॅनिपुलेशनशी संबंधित आहेत.
गेल्या चार महिन्यांत 3.25 लाख बँक खाती गोठवली आहेत
या फसवणूक करणाऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी, I4C विंगने गेल्या चार महिन्यांत (जानेवारी ते एप्रिल) विविध कायदे अंमलबजावणी संस्थांच्या मदतीने आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांतून सुमारे 3.25 लाख बँक खाती गोठवली आहेत. याशिवाय ५.३ लाख सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले. व्हॉट्सॲप ग्रुपसह 3,401 सोशल मीडिया खातीही गोठवण्यात आली आहेत.