नवीन वर्षाच्या स्वागताचे संदेश व्हॉट्सॲपवरून मित्र, नातेवाइकांना पाठविणे, हे आता आपल्या सवयीचे झाले आहे. दरवर्षी आपण मित्र, नातेवाईकांना न चुकता शुभेच्छा देणारे मेसेज पाठवत असतो. आताही नवीन वर्षाचे स्वागत करणारे मेसेजीस व्हॉट्सॲपवर फिरू लागतील. मात्र, अनोळखी येणारे मेसेज तुमच्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदावर विरजण आणू शकतात, मोठे आर्थिक नुकसान करू शकतात. होय, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या मेसेजपासून सावधान व्हा, कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा !
नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर होणारी सायबर फसवणूक ही एक नवीन आणि धोकादायक पद्धत आली आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमचा महत्त्वाचा डेटा चोरून घेत आहेत.
हॅकर्स, फसवणूक करणारे युजर्सची वैयक्तिक माहिती, पैसे चोरी करतात. बनावट हॉलिडे गिफ्ट व्हाउचर, लोकप्रिय ईकॉमर्स वेबसाईटसाठी डिस्काउंट कुपन अशी आमिषे दाखवून बनावट लिंक पाठवून यूजर्सचे काम तमाम करू शकतात.
हे मेसेज कशाप्रकारचे असतात पाहूया :
फिशिंग लिंक्स (Fishing Links) :
व्हाट्सअँप यूजर्सना एक आकर्षक मेसेज येतो, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छाबरोबर एक लिंक अथवा वेबसाईट दिली जाते. यावर क्लिक केल्यावर यूजर्सना एक फेक वेबसाइटवर नेले जाते. जिथे यूजर्सकडून त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल्स, बँक अकाउंटची डिटेल्स किंवा इतर महत्त्वाची माहिती भरण्यास सांगितले जाते. अशी माहिती भरल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
बऱ्याचदा आपण पहिले असेल कि कोणतीही खातरजमा न करता मित्रांकडून नामांकित कंपन्यांच्या नावे असलेल्या लिंक फॉरवर्ड केल्या जातात, त्यामध्ये कुपन अथवा अथवा गिफ्टचे आमिष असते. जसे जिओ कंपनीकडून फ्री रिचार्ज. समजा एखाद्या मित्राकडून एखादी वेबसाईट अथवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करणे टाळा. कारण ती वेबसाईट अथवा लिंक बनावट असू शकते , कि ज्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे गायब केले जाऊ शकतात. हीच बाब फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या वेबसाईटवरही पाहावयास मिळते. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी पूर्ण माहिती आणि खात्री करावी. अन्यथा क्लिक करणे टाळावे.
मैलवेअर:
काहीवेळा, या मेसेजीसमध्ये एक व्हायरस असतो, कि जो यूजर्सच्या फोनमध्ये आपोआप डाउनलोड होतो. आणि व्हायरस फोनमधील सर्व माहिती चोरून घेऊ शकतो.
फॉल्स गिफ्ट्स:
यूजर्सना असे सांगितले जाऊ शकते की, तुम्ही एक लॉटरी जिंकली आहे किंवा तुम्हाला एक मोफत गिफ्ट मिळाले आहे. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी यूजर्सना काही पैसे देण्याची आवश्यकता असते.
ही काळजी घ्यावी :
– अज्ञात लिंक्सवर क्लिक नको : व्हाट्सअपवर अज्ञात व्यक्तीकडून कोणताही मेसेज आला तर त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याचे टाळा.
– लॉगिन किंवा बँक अकाऊंटची माहिती कोणालाही सांगू नका : आपले लॉगिन क्रेडेंशियल्स किंवा बँक अकाऊंटची माहिती मागितल्यास देण्याचे टाळा.
– मोफतच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका : जर कोणताही मोफतच्या ऑफर्स आल्या असतील, तर त्याची तपासणी करा आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवावी.
– फोनवर चांगले अँटिवायरस प्रोग्राम इंस्टॉल करा : एक चांगला अँटिवायरस प्रोग्राम तुमच्या फोनला मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो.
– नियमितपणे पासवर्ड बदलत रहा: तुमच्या विविध अकाउंटचे पासवर्ड नेहमीपेक्षा वेगळे आणि मजबूत तसेच ते लक्षात राहणारे असावेत. तसेच ते नियमितपणे बदलत राहावे.
– आलेल्या मेसेजची तपासणी करा : एखादा मेसेज खूप चांगला वाटत असेल, तर प्रथम तो तपासा. त्याच्या सत्यतेबाबत जाणून घ्यावे.
– मित्र, नातेवाईकांशी संपर्क करा : मित्र, नातेवाईकांच्या नवे एखादा संशयास्पद मेसेज आला असेल, तर संबंधीत मित्रा किंवा नातेवाईकांशी संपर्क साधून सत्यतेबाबत पडताळणी करा.
– मोबाईलचे सॉफ्टवेअर नियमित अपडेट करत रहावे.
– सर्वप्रथम तुमच्या बँकेशी संपर्क साधून अकाउंट मधील व्यवहार थांबविण्यास सांगावे.
– सायबर पोलिसांशी संपर्क साधा: तूम्हाला सायबर फसवणुकीचा बळी ठरवले गेले आहे, असे जाणवल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
सर्वात महत्वाचे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना फोन करा किंवा त्यांना थेट भेट द्या.
येथे संपर्क साधा :
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.