सायबर गुन्हेगार/ हॅकर्स नवनवीन प्रकारांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडे ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारवर ‘कॉलर ट्यून’द्वारे जागृती करण्याची वेळ आली. आपण पाहत आहोत कि हॅकर्स ओटीपी (वन टाइम पासवर्ड) जाणून घेऊन बँक अकाऊंटमधून पैसे काढत असल्याचे सर्रास प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोणालाही ओटीपी शेअर न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कि ओटीपी विनाही बँक अकाउंट हॅक केले जात आहे. हॅकर्सना आता ओटीपी किंवा एटीएम पिनची गरज राहिलेली नाही, त्याशिवायही ते बँक अकाऊंटमधून पैसे चोरत आहेत.
त्यासाठी सायबर गुन्हेगार/ हॅकर्स हे असे काही मेसेज पाठवतात कि ते अधिकृत बॅंकचेच असल्याचा भास होतो. त्यामध्ये बनावट लिंकही असते, जर कोणी या लिंकवर क्लिक केले, कि त्याच्या अकाऊंटमधून पैसे चोरी होतात.

आता पाहूया, ही फसवणूक कशी केली जाते ते…
हे हॅकर्स अशा ठिकाणाहून डेटा गोळा करत असतात, ज्या ठिकाणी लोकांनी त्यांचे फोन नंबर्स शेअर केलेले असतात. हा डाटा गोळा करून ते संबंधितांना अलीकडेच केली गेलेल्या शॉपिंगच्या आधारे लिंक असलेला बनावट मेसेज पाठवितात.
याशिवाय सायबर गुन्हेगार/ हॅकर्स तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमचे फिंगरप्रिंट चोरी करू शकतात. त्या आधारे ओटीपी अथवा एटीएम पिनचा वापर न करताही बँक अकाऊंटमधून पैसे चोरी करू शकतात.
आता पाहूया, फिंगरप्रिंट फसवणूक कशी केली जाते…
सुरवातीला सायबर गुन्हेगार हे तुमचा आधार कार्डचा नंबर मिळवतात. त्यावरील फिंगरप्रिंटच्या आधारे बँक अकाऊंटच्या डिटेल्स घेतात आणि बँकेतून पैसे चोरतात. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रथम आपण बायोमेट्रिक लॉक करणे गरजेचं आहे.
आधार कार्डवरील बायोमट्रीक लॉक कसे करायचे पाहू…
बायोमट्रीक लॉक करण्यासाठी आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन (https://uidai.gov.in/) त्यावरील ‘मायआधार’वर (MY ADHAAR) क्लिक करावे लागेल. त्यामध्ये ‘बायोमट्रीक लॉक’ हा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन निवडला कि तुमचे बायोमेट्रिक लॉक होईल. हा ऑप्शन सेट होण्यापूर्वी तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल, तो दिला कि बायोमेट्रिक लॉकचा ऑप्शन सेट होईल.
ताजे उदाहरण म्हणजे, नवी दिल्लीत एका २६ वर्षीय महिलेने ‘क्रोमा’मधून एचपी कंपनीचा लॅपटॉप खरेदी केला. काही दिवसांनी त्यांना अनोळखी नंबरवरून एक व्हाउचर जिंकल्याचा मेसेज आला. या मेसेजमध्ये व्हाउचर ‘क्लेम’ करण्यासाठी त्याना पर्सनल माहिती भरण्यास सांगितली गेली. त्यासाठी एक लिंकही पाठवली, त्यामध्ये बँक डिटेल्सचाही समावेश होता.
संबंधित महिला या मसेजबाबत शंका आली. कारण त्या मेसेजमध्ये ‘क्रोमा’ आणि ‘विजय सेल्स’ असे दोन उल्लेख होते. त्यामध्ये जिंकलेलं व्हाउचर हे विजय सेल्समधून खरेदी केल्याबद्दल आहे, असा उल्लेख होता. ही शंका आल्याने त्यांनी पुढे माहिती भरणे थांबवले, ज्यामुळे त्या या फसवणुकीपासून वाचल्या.
अलीकडच्या काळात फिशिंग लिंक्सशिवाय हॅकर्स कॉल मर्जिंग, कॉल फॉरवर्डिंग, व्हॉइस मेल स्कॅम, क्यूआर कोड फ्रॉड आणि स्क्रीन शेअरिंग सारख्या फसवणूक पद्धतींचा वापर केला जात आहे.

अशा फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहायचे?
– अनोळखी कॉल आणि मेसेजपासून सावध रहावे .
– कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवेदनशील, वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे
– संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, जरी ते व्हाउचर, ऑफर्स किंवा रोख बक्षिसे देण्याचे आश्वासन देत असले तरीही.
– खात्री नसलेले किंवा संशयास्पद अॅप्स फोनवर इन्स्टॉल करू नये, कारण यामुळे हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेरा आणि फोटो गॅलरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. कि जे बहुतेकदा केवायसी व्हेरिफिकेशनसाठी वापरले जातात.
– समजा एखादा आमिष दाखविणारा कॉल आला तर अधिकृत माध्यमांद्वारे त्या कॉलरची ओळख पडताळून पहा, असे कॉल ब्लॉक करून टाका
– नियमितपणे बँक अकाऊंची स्टेटमेंट्स चेक करत राहावे.
– बँक अकाउंटमधील प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळण्यासाठी एसएमएस, ई-मेल अलर्ट सेवा ऍक्टिव्ह करावी

ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून बचावासाठी Law Enforcement Agency आणि सरकारी संस्था सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत, फ्रॉड फोन नंबर ब्लॉक केले आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रकरणांचा तपास करत आहेत. तथापि, या फसवणुकीबाबत जागरूक राहणे आणि सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.