अॅप डाऊनलोड केले; २०० कोटी गेले

झटपट कर्जाला भुलले ः पाच लाख लोकांना फटका

झटपट कर्ज देणासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. यातील काही कंपन्या गरजूंना हेरून त्यांना या जाळ्यात ओढत आहेत. एका क्लिकवर कर्ज',आधार कार्ड दाखवा कर्ज मिळवा’, कागदपत्रांविना कर्ज अशा जाहीराती करून लोकांना आकर्षित केले जात आहे आणि लोकही किचकट कागदपत्रांच्या प्रक्रिया नको म्हणून किंवा गरजेपोटी असे शाॅर्टकटचे मार्ग अवलंबतात. अशा घटना सातत्याने घडत असतानाही लोक फसतात, हेही तितकेच खरे आहे. अशीच एक कर्जाच्या आमिषाला भूलून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या जाळ्यात थोडेफार नव्हे तर तब्बल पाच लाख लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे.


भोपाळमधील एका साॅफ्टवेअर इंजिनिअरने Mast Money नावाच्या अॅपच्या माध्यमातून लाखो लोकांना चुना लावला आहे. त्यासाठी त्याने Mast Money हे अॅप डेव्हलप केले, शिवाय वेबसाईटही तयार केली आणि त्याद्वारे झटपट कर्ज देण्याचा फंडा राबवला. झटपट कर्ज मिळते म्हणून देशभरातून तब्बल पाच लाख लोकांनी अॅप डाऊनलोड केले आणि त्यानंतर सुरू झाला फसवणुकीचा खेळ.
Mast Money नावाचे अॅप डाऊनलोड करताच, भलत्याच जाळ्यात हे लोक अडकले. कारण मोबाईलमधील फोटो, कॉन्टॅक्ट्स नंबर्स, फोटो गॅलरी आणि वैयक्तिक माहिती दुसऱ्याच्या ताब्यात गेली आणि ब्लॅकमेलचा खेळ सुरू झाला. यामध्ये १५ हजाराचे कर्ज राहीले बाजूलाच, या लोकांनाच स्वतःकडील ५० हजारापर्यंतची रक्कम द्यावी लागली आहे. देशभरातील पाच लाख लोकांची तब्बल २०० कोटींची फसवूक झाल्याचे पुढे येत आहे. आणि ही फसवणूक उघडकीस आणली ती नागपूर सायबर सेलने. यात सहभागी भोपाळमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली असून तोच याचा मुख्य सुत्रधार आहे. त्यामुळे असे कोणते अॅप जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल, तर खात्री करा, त्या अॅपची सविस्तर माहिती घ्या आणि गरज नसेल तर असे अॅप अनइन्स्टाॅल करा.

अशी केली फसवणूक –
भोपाळमध्ये राहणाऱ्या कामिल सिद्दिकी (वय ३१) या इंजिनिअरने Mast Money नावाचे अॅप तयार केले. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर गरजूंना १५ हजारापर्यंतचे कर्ज काही तासांत दिले जायचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैशांची गरज असलेल्या लोकांना हे ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात असे. लोकांनी योग्य तपासणी न करता ॲपला परवानगी (अँप्रूव्हल) दिली की, एपीके (APK) फाईल्सच्या माध्यमातून त्यांच्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो आणि व्हिडिओचा ताबा मिळवला जात असे. १५ हजार कर्जापोटी ३० दिवसांत २५ हजार वसूल केले जायचे. पैसे न भरल्यास ब्लॅकमेलर कर्जदाराकडून अवास्तव पैशांची मागणी करायचे. पैसे न दिल्यास कर्जदार महिला अथवा पुरूषांच्या सर्व संपर्क क्रमांकावर अश्लिल फोटो, मेसेज पाठवले जायचे.
अशाच प्रकारे एका महिला कर्जदाराला त्रास देऊन तिची बदनामी केली. त्यामुळे त्या महिलेने नागपुरातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या रॅकेटचा छडा लावला. त्यात भोपाळचे कनेक्शन दिसून आले, पोलिसांनी भोपाळमध्ये जाऊन संशयित कामिल सिद्दिकीला अटक केली. या रॅकेटने गुन्हेगारीसाठी एक कॉल सेंटर, मार्केटिंग आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन वेगवेगळ्या शाखा तयार केल्या होत्या. संशयितांच्या टेलिग्राम ग्रुप्स, बँक अकाऊंट आणि यूपीआय (UPI) व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

कोण आहे मास्टरमाईंड?
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील बेर्सिया भागात राहणारा कामिल सिद्दिकी (वय ३१) हा उच्चशिक्षित तरूण आहे. कामिलने बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (BCA) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) असे उच्च शिक्षण घेतले असून, त्याने हे मस्त मनी ॲप व वेबसाईट डेव्हलप केली. पोलिसांनी त्याच्याकडून 1 मोबाईल, 2 सिम कार्ड आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा मुख्य किंगपिन वेगळा असून, त्याच्यासह इतर तीन संशयितांचा शोध घेतला जात आहे.

ओळख लपवण्यासाठी VPN चा वापर –
स्वतःची ओळख व ठिकाण समजू नये यासाठी संशयितांनी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा (VPN) चा वापर केला. त्यामुळे ते कोठून संपर्क साधतात हे कळत नव्हते. मात्र, संशयिताने काही काळासाठी ईमेल लाॅगिन केले होते, हाच धागा पकडून पोलिसांना संशयितापर्यंत पोहोचणे शक्य झाले.

पाच लाख लोकांच्या मोबाईलवर Mast Money –
Mast Money हे ॲप्लिकेशन देशभरातील तब्बल 5 लाख 32 हजार युजर्सनी डाउनलोड केले होते. त्यापैकी अंदाजे 2 लाख 34 हजार युजर्सच्या मोबाईलमध्ये हे ॲप अजूनही इन्स्टॉल असल्याचे समोर आले आहे. ॲपचे सक्रिय युजर्स पाहता फसवणुकीची रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

गुगलने हटवले अॅप –
नागपूर पोलिसांच्या तातडीच्या विनंतीनंतर गुगलने हे Mast Money ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे, तसेच लवकरच त्यांची वेबसाईटही बंद केली जाणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *