संशयास्पद कॉल, मेसेज, लिंक आणि ॲप्सपासून संरक्षणासाठी गुगल-ॲपलचे विशेष फीचर्स

एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) कामे सोपी झाली असली, तरी दुसरीकडे त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांसाठीही नवीन मार्ग खुले झाले आहेत. बहुतांश फसवणुकीचे प्रकार मोबाईल फोनद्वारे घडत असल्याने, संशयास्पद कॉल्स, संदेश (messages), लिंक्स आणि ॲप्सपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी गुगल (Google) आणि ॲपल (Apple) यांनी विशेष फिचर्स (features) आणली आहेत. यातील अनेक फिचर्स थेट फोनवर AI चा वापर करून काम करतात.
बनावट कॉल, संशयास्पद मेसेज, फिशिंग लिंक्स, बनावट ॲप्स आणि डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीतून लोकांना आर्थिक तसेच वैयक्तिक माहितीचे नुकसान सहन करावे लागत आहे.
गुगलच्या अँड्रॉइड सिस्टिममध्ये स्पॅम कॉल आणि मेसेज ओळखण्यासाठी विविध सुरक्षा फिचर्स उपलब्ध केले आहेत. संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास युजर्सला अॅलर्ट दिला जाऊ शकतो. गुगल प्ले प्रोटेक्टच्या माध्यमातून ॲप्सची तपासणी केली जाते. संभाव्य धोकादायक किंवा हानिकारक ॲप आढळल्यास त्याबाबत सूचना देणे, ॲपचे स्कॅनिंग करणे आणि काही प्रसंगी त्याची इन्स्टाॅलेशन रोखणे यासारख्या उपाययोजना केल्या जातात.
फिशिंग आणि धोकादायक वेबसाइटपासून संरक्षणासाठी क्रोममध्येही सुरक्षा सिस्टिम आहे. एखाद्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वेबसाइट संशयास्पद असल्याचे आढळल्यास युजर्सला सुचित केले जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची घाई युजर्सकडून टाळण्यास मदत होते.
ॲपलच्या आयफोनमध्येही संशयास्पद कॉल, संदेश, वेबसाइट आणि ॲप्सपासून संरक्षण देणारी विविध फिचर्स आहेत. अनोळखी आलेले मेसेज वेगळे करण्याची सुविधा, संशयास्पद वेबसाइटबाबत अॅलर्ट तसेच ॲप्सच्या परमिशनवर नियंत्रण यामुळे युजर्सला अतिरिक्त सुरक्षा मिळते.
असे असलेतरी, कोणतेही AI किंवा सुरक्षा फीचर शंभर टक्के संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे अनोळखी कॉल, संशयास्पद लिंक, OTP मागणारा मेसेज किंवा तातडीने पैसे भरण्यास सांगणारे काॅल किंवा मेसेज आल्यास सावध राहणे आवश्यक आहे. AI सुरक्षा वाढवू शकते; मात्र अंतिम निर्णय आणि सावधगिरी बाळगणे युजर्सच्या हातात आहे.

अँड्रॉइडच्या या सुरक्षा फिचर्सबद्दल (security features) :
आता जाणून घेऊया, या फिचर्स विषयी…
१. फेक कॉल डिटेक्शन (Fake Call Detection)
जर एखाद्या सेव्ह केलेल्या नंबरवरून कॉल आला, परंतु कॉल करणारी व्यक्ती ती मूळ व्यक्ती नसेल, तर हे फिचर अॅलर्ट करते. तसेच, ‘कॉल फॉरवर्डिंग’सारख्या परिस्थितींमध्ये संशयास्पद कॉल्स ओळखण्यासही हे मदत करते. हे फिचर ‘गुगल फोन ॲप’ (Google Phone app) वापरणाऱ्या आणि अँड्रॉइड १२ किंवा त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या उपकरणांवर उपलब्ध आहे आणि ते डीफॉल्ट असते.
यासाठी सेटिंग असे –
Phone App > settings > Caller ID and Spam
२. स्कॅम डिटेक्शन (फसवणूक ओळखणे)
कॉलदरम्यान काही संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्यास, पर्सनल माहिती शेअर करण्याबाबत हे फिचर तुम्हाला सावध करते. हे फिचर गुगलच्या ‘पिक्सेल ९’ (Pixel 9) आणि त्यापुढील मॉडेल्सवर, तसेच सॅमसंग ‘एस२६’ (Samsung S26) आणि इतर फ्लॅगशिप फोन्सवर उपलब्ध आहे.
यासाठी सेटिंग असे –
Phone App > settings > Scam Detection
३. कॉल्स हाताळण्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंट
जेव्हा एखादा कॉल येतो, तेव्हा तुम्ही ‘कॉल स्क्रीन’ (Call Screen) किंवा ‘कॉल असिस्ट’ (Call Assist) हा ऑप्शन निवडू शकता. यामुळे एक व्हर्च्युअल असिस्टंट तुमच्या वतीने तो कॉल हाताळू शकतो. कॉल संपल्यानंतरही तुम्ही त्याचे ट्रान्सक्रिप्ट (संभाषणाचा लिखित मजकूर) किंवा रेकॉर्डिंग पाहू शकता. हे फिचर निवडक गुगल (Google) आणि सॅमसंग (Samsung) फोन्सवर उपलब्ध आहे.
४. मेसेजेसमध्ये फसवणुकीबाबत अॅलर्ट –
‘गुगल मेसेजेस’ (Google Messages) संशयास्पद मेसेजेस ओळखते आणि त्यावर ‘Likely a Scam’ अशी नोटिफिकेशन दर्शवते.

यासाठी सेटिंग असे –
Google Messages > Messages settings > Protection & Safety > Enable Spam protection
५. इतर ॲप्सपासून OTP हाईड करणे –
Android 17 मध्ये, WebOTP आणि SMS Retriever सारख्या फिचर्सचा वापर करून अनधिकृत ॲप्सपासून OTP हाईड करता येतात. एकदा का मेसेजमध्ये OTP आढळला की, सिस्टीम तो अशा ॲप्सपासून ३ तासांपर्यंत लपवून ठेवते.
आता पाहूया, आयफोनमध्ये फसवणुकीचे प्रकार ओळखण्याची (scam detection) पद्धती :
१. अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्सचे Screening करणे –
हा फोन अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्सना आपोआप उत्तर देऊ शकतो आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव व कॉल करण्याचे कारण विचारू शकतो.
यासाठी सेटिंग असे –
Settings > Apps > Phone > Screen Unknown Callers > Ask Reason for Calling
२. स्पॅम मेसेजेस हाताळण्याची आॅटो फिचर्स –
अनोळखी आलेल्या मेसेजेसमध्ये असलेल्या लिंक्स थेट उघडण्यापासून आयफोन रोखतात. एखादी लिंक उघडण्यासाठी, तुम्हाला ती लिंक कॉपी करून ब्राउझरमध्ये पेस्ट करावी लागते किंवा तो मेसेज ‘सुरक्षित’ (safe) म्हणून मार्क करावा लागतो. यामुळे अशा लिंक्स थेट उघडल्यामुळे होणाऱ्या फसवणुकीचा धोका कमी होतो.
- अनोळखी मेसेज राहणार स्वतंत्र –
iPhone मध्ये फोनमध्ये सेव्ह असलेल्या तसेच अनोळखी मैसेज हे स्वतंत्रपणे ठेवले जातात. अनोळखी मेसेजीसचे नोटिफिकेशन्सही येत नाहीत
यासाठी सेंटिंग असे –
Messages > Filter > Manage Filtering > Screen Unknown Senders.