
सायबर फसवणुकीचे रोज नवनवीन फंडे उघडकीस येत असून लोकांचे पैसे गायब करण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत चालले आहे. यात आता एका नव्या प्रकाराची भर पडली आहे. ती म्हणजे व्हॉट्स ॲपवर लग्नाचे निमंत्रण. यामध्ये व्हॉट्स ॲपवर लग्नपत्रिकेची फाईल अथवा लिंक पाठवली जाते, त्यावर क्लिक केले कि ती फाईल फोनमध्ये इन्स्टॉल होते व फोन हँग होतो. असे फोन हॅक करून बँक अकाऊंटमधून पैसे गायब करण्यासह कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज पाठवून पैश्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे अनोळखी लग्न पत्रिकेची फाईल आल्यास त्यावर क्लिक करणे टाळावे.
सायबर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, डिजिटल लग्नपत्रिका हा फसवणुकीचा सायबर गुन्हेगारांच्या नवीन तसेच मोठ्या डिजिटल रॅकेटचा एक भाग आहे. आज मोबाईल वापरणारा हमखास व्हॉट्स ॲप वापरतो, त्यामुळे त्यामुळे कोणालाही असा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे अनोळखी येणारे मेसेज ओपन करण्याची घाई करू नका.
हिमाचल प्रदेशात नुकताच हा सायबर फसवणुकीचा (Cyber Scam) प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये सायबर हॅकर्सकडून अनोळखी नंबरवरून लोकांना व्हॉट्स ॲप मेसेजद्वारे फाईल अथवा लिंक पाठवली गेली. ज्यामध्ये लग्नाचे निमंत्रण होते. लोकांनी कोणाचे निमंत्रण आहे हे पाहण्यासाठी त्या मेसेजवर क्लिक केले आणि त्यानंतर त्यांचे फोन हॅक झाले. अनेकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब झाले, तर अनेकांना पैश्यांची मागणी करणारे मेसेज पाठवले गेले. नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेऊन पैसे उकळले गेले. याबाबत हिमाचल प्रदेश पोलिसांनी पत्रक काढून या फसवणुकीबाबत नागरिकांना सावधान केले.
हिंगोलीतही अशाच प्रकारचा फसवणुकीचा प्रकार घडला. असे प्रकार देशभरात घडत आहेत आणि बऱ्याच वेळा पीडित व्यक्ती घाबरून किंवा नाव जाहीर होण्याच्या भीतीने पोलिसांत तक्रार देखील दाखल करत नाही.
खरेतर व्हाट्स अँपवर पाठवली जाणारी APK फाईल (म्हणजे Android Application Package) असते किंवा लिंक असते, कि ज्यावर क्लिक करताच ती डाउनलोड होऊन मालवेअर (सायबर गुन्हेगार संवेदनशील माहिती चोरण्यासाठी, ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणण्यासाठी, अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी किंवा व्यक्ती किंवा संस्थांकडून खंडणी मागण्यासाठी मालवेअरचा वापर करतात) इन्स्टॉल होतो आणि तुमच्या फोनचा पूर्ण ऍक्सेस हॅकर्सकडे जातो. त्यामुळे याचा वापर करून बँक अकाउंट अथवा गोपनीय माहितीच्या आधारे पैसे गायब करू शकतात अथवा फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज पाठवून हॅकर्स पैशांची मागणी करू शकतात.
याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्येही स्कॅमर्सनी लग्नपत्रिकेच्या नावाखाली हजारो लोकांना टार्गेट केले होते. लोक भावनिक काफोनमध्ये रणामुळे लग्नाचे आमंत्रण लगेच उघडतात आणि स्कॅमर्स याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर पैशांची लूट करतात.

असे स्कॅम वाढत चाललेत
सायबर एक्सपर्ट्स सांगतात की, सध्या सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सवर फसवणुकीची नवी लाट आली आहे. कोणी कधी जॉब ऑफरच्या नावाखाली, तर कोणी बक्षिसे किंवा लकी ड्रॉच्या नावाखाली, तर आता लग्नपत्रिकेच्या बहाण्याने लोकांना फसवत आहेत.
अशी झाली फसवणूक…
एका व्यावसायिकाला अनोळखी नंबरवरून व्हॉट्स ॲपवर लग्न पत्रिकेची लिंक आली. कोणी परिचित असेल असे समजून त्याने त्या लिंकवर क्लिक केले. त्यांनतर काही वेळातच ती फाईल इन्स्टॉल होऊन त्या व्यक्तीचा फोन हँग झाला. त्याला काही समजेना तो तात्काळ फोन दुरुस्ती करणाऱ्या दुकानात गेला, तेथे काही वेळ फोन स्विचऑफ करण्यात आला. त्यांनतर पुन्हा फोन पूर्ववत सुरु झाला.
मात्र, दुसऱ्या दिवशी त्या व्यावसायिकाने बँक अकाउंटचा बॅलन्स चेक केला असता आठ वेळा दहा-दहा हजारांची रक्कम अकाउंटमधून काढल्याचे दिसले आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याच्या लक्षात आले कि काळ जी लग्न पत्रिकेची लिंक अली होती, त्या लिंकच्या आधारेच हे झाले आहे. त्याने तत्काळ पोलीस तसेच सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, 2000 च्या कलम 66 डी अंतर्गत, ऑनलाइन फसवणूक तसेच कोणी, कोणत्याही कम्युनिकेशन उपकरणाद्वारे किंवा कॉम्पुटर सिस्टीमद्वारे चुकीची ओळख दाखवून फसवणूक करतो, त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

या फसवणुकीपासून दक्ष कसे रहाल :
– व्हॉट्स ॲप, ईमेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या अनोळखी लिंक किंवा फाइलवर क्लिक करू नका.
– एखादा मेसेज संशयास्पद वाटल्यास तो तात्काळ डिलीट करा
– आलेला मेसेज ओपन करण्यापूर्वी संबंधिताला फोन करून खात्री करून घ्या
– मोबाईलमध्ये अनोळखी APK किंवा अँप इन्स्टॉल करणे टाळा.
– बँके अकाउंटची माहिती किंवा ओटीपी कोणालाही शेअर करू नका.
– संशयास्पद मेसेज मिळाल्यास लगेच ब्लॉक करा आणि सायबर सेलला कळवा.

ऑनलाईन तक्रार कोठे नोंदवावी :
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून बचावासाठी Law Enforcement Agency आणि सरकारी संस्था सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत, फ्रॉड फोन नंबर ब्लॉक केले आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रकरणांचा तपास करत आहेत. तथापि, या फसवणुकीबाबत जागरूक राहणे आणि सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.
ऑनलाईन अथवा सायबर फसवणुकीची तक्रार https://cybercrime.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवावी. तसेच प्रत्येक राज्यासाठी फोननंबर दिलेले असून त्यावरही तक्रार नोंदवता येऊ शकते. महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा फोन नंबर आहे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याने 1930 हा क्रमांक जारी केला आहे. त्यावरही तक्रार नोंदवता येईल.