एकीकडे एआयचा वापर करून अनेक कामे अक्षरशः चुटकीसरशी मार्गी लागत आहेत, अनेक ठिकाणी एआयचा वापर केला जाऊ लागला आहे, हे होत असताना त्याचा गैरवापरही होत असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. एका महिलेने चक्क एआयचा वापर करून लोकलचा पास बनवला, लोकलमधून प्रवास करताना तपासणी दरम्यान टीसीला संशय आला. त्याने तात्काळ पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एक महिला मुंबईत मध्य रेल्वेच्या कल्याण–दादर असा एसी लोकलने प्रवास करत होती, टीसी विशाल नवले हे
तिकिटांची तपासणी करत होते, त्यांनी त्या महिलेकडे तिकीटाची मागणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकृत UTS (Unreserved Ticketing System) मोबाईल अॅपवरील पास उघडत नसल्याचे सांगून, त्याऐवजी ब्राउझरवरील लिंक दाखवली. त्यावरील QR कोड काम करत नसल्याचे दिसले.
मग टीसी नवले यांनी सीआर नियंत्रण कक्षाशी (Central Railway) संपर्क साधला, त्यावेळी त्यांना समजले की महिलेकडील पास हा त्या तिकीट क्रमांकाचा संबंध फेब्रुवारीमध्ये जारी केलेला होता. त्यानंतर टीसीने संबंधित महिलेला ताब्यात घेऊन कल्याण जीआरपीकडे सोपवले. ही महिला खाजगी बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. महिलेकडील पास हा तिच्या नवऱ्याने एआयचा वापर करून बनवल्याचे त्या महिलेकडील चौकशीत समोर आले.
पेशाने इंजिनियर असलेल्या पतीने कोडिंग तसेच एआय टूल्स वापरून हा बनावट पास तयार केल्याची कबुली महिलेने दिली आणि तो आपल्या पत्नीला दिल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी सांगितले कि, या जोडप्याचा बनावट डिजिटल पास तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटशी संभवित संबंध असू शकतो.
गुडिया ओमकार शर्मा (28) असं या महिलेचं नाव आहे. ती एका बँकेत सेल्स मॅनेजर आहे. जवळपास एक लाख रुपये मासिक पगार असूनही ती अनेक महिन्यांपासून बोगस पास दाखवून एसी लोकलमधून प्रवास करत होती. महिलेचा पती ओमकार आनंदी शर्मा (30) तिला यामध्ये मदत करायचा.
मध्य रेल्वेने प्रवाशांना परवानाधारक काउंटर, एटीव्हीएम किंवा अधिकृत UTS अॅपद्वारेच तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले असून, बनावट तिकिटावर प्रवास करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी सात वर्षांपर्यंतची कैद, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला आहे.